सिनेमा- काबिल
कलाकार- हृतिक रोशन, यामी गौतम, रोनित रॉय, रोहित रॉय, गिरीश कुलकर्णी
दिग्दर्शक- संजय गुप्ता

बॉलिवूडचा ग्रीक गॉड अशी ओळख असलेल्या ऋतिक रोशनचा ‘काबिल’ हा बहुचर्चित सिनेमा आज प्रदर्शित झाला. आतापर्यंत आलेल्या त्याच्या सिनेमांकडे प्रेक्षकांने पाठच फिरवली होती. त्यामुळे ‘काबिल’मध्ये त्याच्या अभिनयाची जादू पाहायला मिळणार का असाच प्रश्न उपस्थित केला जात होता.

‘काबिल’ हा सिनेमा पाहिल्यानंतर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर नक्कीच मिळतं असं म्हणायला हरकत नाही. ‘काबिल’मधील त्याच्या अभिनयाला परत एकदा दाद दिली जात आहे. गेल्या काही वर्षात हृतिकला सिनेमांत अपेक्षिक यश मिळाले नसले तरीही त्याच्या करिअरला पुन्हा एकदा उभारी देण्यासाठी हा सिनेमा मदत करेल असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही.

काबिल ही गोष्ट आहे रोहन (हृतिक रोशन) आणि सुप्रिया (यामी गौतम) यांची. अंधत्व हे आपल्या आयुष्यातील कमतरता नाही यावर या दोघांचाही विश्वास असतो. मैत्री, लग्न आणि स्वप्नवत संसार असे सर्व काही चांगले चालत असताना त्यांच्या आयुष्यात अचानक एक वेगळे वळण येते. रोहनच्या या प्रवासात कुठेही हृतिक रोशन दिसत नाही हेच या सिनेमाचे खरे यश आहे असेच म्हणावे लागेल. यामी गौतमची भूमिका फार लक्षवेधी नसली तरी तिच्या वाटेला आलेले काम तिने तिच्या परिने निभावले असेच म्हणावे लागेल. पण, पूर्ण सिनेमात फक्त लक्षात राहतो तो म्हणजे हृतिक रोशन.

दिग्दर्शक संजय गुप्ता याने या सिनेमातील काही दृश्ये ज्या पद्धतीने दिग्दर्शित केली आहे ते खरेच वाखाणण्याजोगे आहेत. ‘कांटे’, ‘शूटआऊट अॅट वडाळा’, ‘जज्बा ‘यांसारखे अॅक्शनपॅक्ट सिनेमांची दिग्दर्शन करणाऱ्या संजयचा या सिनेमातही स्पेशल टच पाहायला मिळतो. ‘काबिल’मध्ये ज्या पद्धतीने मारामारीची दृश्य चित्रित करण्यात आली आहेत, ती जरी अॅक्शनपॅक्ट असली तरी ती एखाद्या अॅक्शन हिरोप्रमाणे अजिबात वाटत नाहीत.

डबिंग आर्टिस्ट असलेला रोहन कशा प्रकारे त्याच्या आवाजाचा उपयोग सूड घेण्यासाठी करतो हे उत्तमरित्या दाखवण्यात आले आहे. अमित शेलार (रोहित रॉय) आणि त्याचा साथिदार वसीम (सहिदूर रेहमान) यांच्यामुळे एका क्षणात रोहनचे आयुष्य उद्धस्त होते आणि मग सुरू होतो, न्यायव्यवस्था, पोलीस, गुंड आणि सर्वसामान्य माणूस यांच्यातील वाद.

अमित शेलारच्या पाठीमागे त्याचा राजकीय क्षेत्रात दबदबा असणारा भाऊ माधवराव शेलार (रोनीत रॉय) उभा असतो. त्यामुळे हिंदी सिनेमात दाखवले जातात त्याचपद्धतीचे ही गुंडगिरी करणारी भांवडं दाखवली आहेत. त्यामुळे काबिलमध्येही हिंदी सिनेमाचाच जुना मसाला पण थोड्या वेगळ्या पद्धतीने दाखवण्यात आला आहे असेच म्हणावे लागेल. गिरीश कुलकर्णी याने लाचखोर पोलीस अधिकाऱ्याची भूमिकाही चांगल्या पद्धतीने वठवली आहे.

सिनेमाच्या पहिल्या भागात उत्साही, सकारात्मक आणि आयुष्याचा आनंद घेणाऱ्या मुलाच्या रुपात हृतिक दिसतो तर उत्तरार्धात मात्र तोच सूड, दुःख यामध्ये बुडालेला दिसतो. रोहनमधला हा बदल हृतिकने उत्तमरित्या साकारला आहे. त्यामुळेच संपूर्ण सिनेमात त्याच्यावरुन नजर हलत नाही. या सिनेमाची तांत्रिक बाजू बघितली तर तांत्रिकदृष्ट्याही हा सिनेमा चांगला बनला गेला आहे. सिनेमॅटोग्राफर सुदीप चॅटर्जी यांच्या कॅमेऱ्यातून हा सिनेमा सुरेख बांधण्यात आला आहे.

राजेश रोशन आणि सलीम- सुलेमान यांनी दिलेले संगीत मात्र फार लक्षात राहणारे नाही. आतापर्यंत राजेश रोशन यांनी ज्या गाण्यांना संगीत दिले ती अनेक गाणी हिट ठरली होती. काबिलच्याबाबतीत मात्र ते होताना दिसत नाही. एकंदरीत हृतिकच्या करिअरला पुन्हा एकदा उभारणी देण्याासाठी हा सिनेमा त्याला मदत करु शकेल असे म्हणायला काही हरकत नाही. पण त्याच्यासमोर खरे आव्हान आहे ते म्हणजे शाहरुखच्या ‘रईस’ला टक्कर देण्याचे.

– मधुरा नेरुरकर

madhura.nerurkar@indianexpress.com