‘क्रिश’मधील सुपरहिरो असो किंवा ‘काबिल’मधील आपल्या पत्नीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी आंधळ्या व्यक्तीची भूमिका असो आपल्या करिअरच्या १७ वर्षांच्या कालावधीत हृतिक रोशनने विविध भूमिका अत्यंत प्रभावीपणे साकारल्या आहेत. आता ४३ वर्षांचा हृतिक बायोपिक साकारण्यासाठी सज्ज झाला आहे. विकास बहलच्या आगामी चित्रपटात हृतिक गणितज्ज्ञाची भूमिका साकारताना दिसणार आहे. या सिनेमाचे नाव ‘सुपर ३०’ असणार असल्याची माहिती मिळत आहे.

पाटणामधील गणितज्ज्ञ आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित ‘सुपर ३०’ हा चित्रपट आहे. पाटणातील आयआयटी विद्यार्थ्यांसाठी कुमार यांनी ‘सुपर ३०’ हा कार्यक्रम सुरू केला आहे. ४४ वर्षांचे गणितज्ज्ञ आनंद कुमार आर्थिकदृष्ट्या दुर्बळ विद्यार्थ्यांसाठी आयआयटी-जेईईचे क्लासेस घेतात. आनंद कुमार त्यांच्या इन्स्टिट्यूट ‘रामानुजन स्कूल ऑफ मॅथमॅटिक्स’मध्ये दरवर्षी ३० विद्यार्थ्यांना निवड करुन त्यांना परीक्षांसाठी तयार करतात.

क्लासेसची फी न परवडणाऱ्या आयआयटीच्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून आनंद कुमार यांनी २००२ मध्ये हा कार्यक्रम सुरू केला आणि १५ वर्षांनंतर आताही कुमार विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी झटत आहेत.

वाचा : वर्सोवा बीच स्वच्छ ठेवण्यात नवाजुद्दीनच्या मुलांचाही हातभार

‘सुपर ३०’ कार्यक्रमाचे संस्थापक म्हणून आनंद यांच्या जीवनातील महत्त्वाचे टप्पे या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळतील. रेहान आणि रिधान या आपल्या दोन मुलांसोबत हृतिक सध्या युएसमध्ये आठवडाभर सुट्टीचं नियोजन करत आहे. सुट्टीनंतर मुंबईला परतल्यावर लगेचच हृतिक या चित्रपटाच्या कामाला लागणार आहे. एका सामान्य व्यक्तीपासून ते उल्लेखनीय गणितज्ज्ञ बनण्यापर्यंतचा आनंद कुमार यांचा प्रवास आता बॉलिवूडचा ग्रीक गॉड हृतिक आपल्याला मोठ्या पडद्यावर दाखवणार आहे.