आजच्या दिवशी ‘रईस’ आणि ‘काबिल’ हे दोन्ही बडे सिनेमे रिलीज झाल्याने बाॅक्स आॅफिसवर फॅन्सची चांदी असली तरी हृतिक आणि शाहरुख या दोघ्या बड्या स्टार्समधला हा महामुकाबला आहे. हे दोघे स्टार्स एकमेकांचे दोस्त असले तरी गेले काही दिवस या दोन सिनेमांच्या निमित्ताने हे दोघे एकमेकांसमोर आल्याचं चित्र होतं.

त्यातच राकेश रोशन यांनी केलेल्या विधानामुळे याची चर्चा आणखी वाढली. ‘रईस’ बघायला जाण्यापेक्षा मी ‘काबिल’ दोनदा पाहणं पसंत करेन असं पापा रोशननी ट्वीट करत जाहीर केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. सिनेक्षेत्रातल्या या दोन पाॅवरहाऊस ब्रँड्समध्ये आता जाहीरपणे वाद होतो की काय असं वाटायला लागलेलं असतानाच हृतिकने ट्वीट करत वातावरण थंड करण्याचा प्रयत्न केला आहे.

आपल्या या ट्वीटमध्ये शाहरुखचा हृतिकने ‘मेंटाॅर’ म्हणून उल्लेख करत आपण त्याचे विद्यार्थी असल्याचं म्हटलंय. काबिलच्या निमित्ताने मला तुझ्याकडून नक्कीच प्रेरणा मिळेल असं हृतिक शाहरूखला म्हणाला.

शाहरुखनेही मग दिलदारपणे उत्तर दिलं. ‘काबिल’ आणि ‘रईस’चं एकत्र रिलीज होणं टाळता न आल्याबाबत आपल्याला वाईट वाटतंय असं सांगत त्याने हृतिकसोबत ‘काबिल’ची अभिनेत्री यामी गौतम,डायरेक्टर संजय गुप्ता तसंच राकेश रोशनना सिनेमाच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

बिगबजेट सिनेमे एकत्र रिलीज होण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधीही तगडी स्टार कास्ट असलेले सिनेमे एकाच दिवशी रिलीज झाले आहेत. त्यातही बड्या स्टार्सच्या बाबतीत हा प्रतिष्ठेचा विषयही होतो. दोन मोठे सिनेमे एकत्र रिलीज होत दोघांच्याही बाॅक्स आॅफिस कलेक्शनवर परिणाम होऊ नये यासाठी बरेच प्रयत्न केले जातात. पण, अशा सिनेमांची रिलीज डेट जाहीर झाल्यावर मग प्रकरण गुंतागुंतीचं होतं. त्या त्या सिनेमासोबत त्यातल्या स्टार्सची इमेज जोडली गेलेली असल्याने मग रिलिज डेटच्या बाबतीत कोण माघार घेणार यावरून मग मोठा इश्यू होतो.

याबाबतीत हृतिकची भूमिका सामंजस्याची आहे. मैत्री आणि व्यावसायिक संबंध वेगळे ठेवावेत असं मत हृतिकने याआधीही व्यक्त केलं होतं. दोन सिनेमांमध्ये स्पर्धा नक्कीच होऊ शकते पण, दोघा मित्रांमध्ये अशी स्पर्धा होऊ नये असं हृतिक याआधी म्हणाला आहे.

‘कोयला’सारख्या सिनेमांमधून एकत्र काम केलेल्या राकेश रोशन आणि शाहरुख खानमध्ये काबिलच्या निमित्ताने वाद झाला असला तरी हृतिकने सामंजस्याची भूमिका घेत ‘रील’ मधली लढाई ‘रियल’ लाईफ मध्ये येणार नाही याची काळजी घेतली आहे.