चित्रपटसृष्टीमध्ये काम करणाऱ्या कलाकारांच्या वाट्याला येणारी प्रसिद्धी आणि एकंदर बी टाऊनचे वातावरण पाहता, बॉलिवूडमध्ये कलाकारांना एखाद्या चित्रपटासाठी किती रुपयांचे मानधन मिळते याबद्दलचा निश्चित आकडा कधीही सहजासहजी कोणासमोर उघड केला जात नाही. याच मानधनाविषयी आपले मत मांडताना अभिनेत्री रिचा चड्डाने स्पष्ट केले आहे, चित्रपटातील एखाद्या पुरुष सहकलाकाराच्या मानधनाएवढीच रक्कम आपल्यालाही मिळत असल्याचे तिने सांगितले आहे.

‘चित्रपटाच्या वाट्याला येणाऱ्या यशावरच बॉलिवूडमध्ये मानधन निश्चित केले जाते. इथे कधीही तुमच्या कौशल्यावरुन आणि तुमच्या अनुभवाच्या अनुशंगाने मानधनाचा आकडा ठरत नाही’, असे रिचाने स्पष्ट केले. यापुढे बोलताना रिचा असेही म्हणाली की, ‘मला आठवतंय, ‘कहानी’ या चित्रपटानंतर विद्या बालनने अभिनेता इम्रान हाश्मीसोबतच्या ‘घनचक्कर’ या चित्रपटासाठी होकार दिला होता. हा एक मोठा व्यवहार होता. त्यामुळे, तिला चित्रपटातील सहकलाकाराएवढेच मानधन देण्यात आले होते. मला असं वाटतं की बॉलिवूडमध्ये बॉक्स ऑफिसला सर्वाधिक महत्त्व दिलं जातं’. रिचाने वृत्तसंस्थेशी बोलताना हे वक्तव्य केले होते.

पाहा: VIDEO: विकी कौशल आणि रिचा चड्डाची ‘हरॅसमेंट’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, चित्रपटांसाठी मिळणाऱ्या मानधनाबद्दल माझी काहीही तक्रार नसून मी मानधनाच्या आहे त्या पद्धतीमध्ये संतुष्ट आहे असेही रिचा म्हणाली. ‘माझ्या बाबतीत बोलायचं झालं तर माझ्या वाट्याला मानधनामुळे कोणताही पेचप्रसंग उद्भवला नाहीये. पण, माझ्यामते दीपिका आणि अनुष्का या आघाडीच्या अभिनेत्री असल्यामुळे त्यांच्या आणि पुरुष सहकलाकारांना मिळणाऱ्या मानधनामध्ये तफावतही असू शकते. पण, माझ्या बाबतीत तसे काही घडत नाही. कोणत्याही चित्रपटातील माझ्या पुरुष सहकलाकाराच्या मानधनाइतकेच मानधन मलाही मिळते आणि मी त्यातच आनंद मानते’, असेही रिचा म्हणाल्याचे वृत्त पिंकविला या संकेतस्थळाने प्रसिद्ध केले आहे.