‘आशिकी २’ हा चित्रपट गाजल्यामुळे रातोरात ‘स्टार’ बनलेल्या श्रद्धा कपूरला त्यानंतर लगोलग दोन-तीन चित्रपट मिळाले. त्यामुळे चर्चेच्या प्रकाशझोतात आलेली श्रद्धा आता नवोदित बॉलीवूड अभिनेत्रींमध्ये ‘टॉप’ची म्हणून गणली जातेय. बॉलीवूड अभिनेत्रींशी तिची तुलना केली जात आहे. त्यावर श्रद्धा म्हणते की, स्पर्धा आहे म्हटल्यावर तुलना होणारच. अशी तुलना मला आवडो अथवा न आवडो, ती टाळणे अशक्य आहे. म्हणून मी अभिनयाकडे संपूर्ण लक्ष केंद्रित केले असून फक्त अधिक चांगला अभिनय करण्याचा प्रयत्न करतेय. लहानपणापासून अभिनेत्री बनण्याचे मी ठरविले होते आणि ते प्रत्यक्षात साकारले आहे, याचे समाधान मला मोठे वाटते.
आरोही ही व्यक्तिरेखा साकारून श्रद्धा कपूर रातोरात स्टार बनली. आता अन्य अनेक प्रकारच्या, अनेक छटा असलेल्या व्यक्तिरेखा साकारण्याचे आव्हान मला पेलायचे आहे. श्रीदेवी ही श्रद्धाची आदर्श अभिनेत्री असली तरी तिच्या स्टाइलचा अभिनय किंवा तिची कॉपी न करण्याचे श्रद्धाने ठरविले आहे. कुणाचीही कॉपी न करता आपल्याला दिलेली व्यक्तिरेखा माझ्या पद्धतीने साकारण्याचा प्रयत्न मी करणार आहे. हल्लीच्या प्रत्येक अभिनेत्रीची स्वत:ची अशी एक पद्धत आहे, असे दिसून येते.
त्यामुळे अमुक एका अभिनेत्रीची कॉपी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पाच वर्षांनंतर तू कारकिर्दीत कुठपर्यंत मजल मारशील, असे विचारल्यावर श्रद्धा कपूर म्हणते, आपल्याला मिळालेली भूमिका साकारण्यासाठी १०० टक्के मन लावून काम करणे हेच माझे एकमेव लक्ष्य आहे.
पाच वर्षांनंतर जेव्हा मागे वळून पाहीन तेव्हा चांगले चित्रपट केल्याचे समाधान मला मिळू शकेल. रेन्सिल डिसिल्व्हा दिग्दर्शित ‘उंगली’ या चित्रपटात श्रद्धा कपूर प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.