केंद्रीय मंत्री रामदास आठवले पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पण यावेळी ते चर्चेत येण्याला निमित्त मात्र थोडे वेगळे आहे. केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी आयटम गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेल्या राखी सावंतबद्दल एक वक्तव्य केले आहे. राखी सावंत निवडणूकीच्या रिंगणात उतरु शकते असा इशारच जणू त्यांनी दिला आहे. ‘राखी सावंत मायावतींविरोधात निवडणूक लढेल. मायावतींनी जरी निवडणूक लढली नाही तरीही राखी सावंत आणि चित्रपटसृष्टीतील इतर काही कलाकार रिपाईच्या प्रचारासाठी रिंगणात उतरतील’, असे आठवले म्हणाले.
उत्तर प्रदेशमधील निवडणुकांमध्ये रिपाई पक्ष हा भारतीय जनता पक्षासोबतच निवडणूक लढवेल. पण, जर असे झाले नाही तर पक्षातर्फे ४०३ पैकी २०० जागांसाठी उमेदवार उभे करण्यात येतील. दरम्यान या निवडणूकांच्या रणधुमाळीमध्ये प्रकाशझोतात आलेल्या राखी सावंतने यापूर्वी आसाम येथील निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पार्टीचा प्रचार केला होता. काही वर्षांपूर्वी राखीने स्वत:चा राजकीय पक्षसुद्धा स्थापन केला होता. महिला सुरक्षेच्या मुद्द्याला अधोरेखित करत राखीने निवडणुकही लढवली होती.
तुर्तास सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकांआधीच वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे राजकारणाची हवा सध्या चांगलीच वाहत असल्याचे पाहायला मिळत आहे. भारतीय जनता पार्टीवर कुरघोडी करण्यासाठी काही राजकीय पक्षांमध्ये युती होण्याची चिन्हे असल्याच्या चर्चांनाही उधाण आले आहे. राजकारण्यांच्या भेटीगाठी आणि त्यातून निघणारे निष्कर्ष काय असणार आहेत याकडेच अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, आठवलेंनी केलेल्या या वक्तव्यावर राखी सावंतची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे राजकीय वातावरणामध्ये चांगलीच गरमागरमी पाहायला मिळत आहे.