सध्या मी कमी बोलणेच योग्य आहे, असे बोलणा-या सलमानने आपला वाचाळपणा पुन्हा सिद्ध केला आहे. आयफा पुरस्कार सोहळ्यासाठी सध्या बॉलीवूडकर माद्रीद येथे पोहचले आहेत. त्यावेळी सलमानने चक्क बॉलीवूडच्या आघाडीच्या अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा यांच्यावरच टिप्पणी केली. या दोघींनाही त्याने हॉलीवूड रिटर्न म्हणून त्यांची थट्टा केली.
नुकत्याचं झालेल्या आयफा पुरस्काराच्या पत्रकार परिषदेत अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धनच्या ‘मिर्झिया’ चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला. त्यावेळी सलमान उशीरा पोहचल्याने त्याला ट्रेलर पाहता आला नाही म्हणून त्याने पुन्हा एकदा ट्रेलर लावण्याची मागणी केली. यानंतर सलमान स्टेजवरून खाली उतरला. पण शाहिद कपूर , फरहान अख्तर, दीपिका पादुकोण, सोनाक्षी सिन्हा, टाइगर श्रॉफ ही मंडळी स्टेजवर उभीच होती. सलमानने त्यांना खाली उतरण्यास सांगितले. त्यावर स्टेजवरील सर्व सेलेब्रिटी खाली उतरले. मात्र प्रियंका चोप्रा आणि दीपिका पदुकोण काही स्टेजवरुन खाली उतरल्या नाहीत. दोघीही एकमेकींशी काही तरी चर्चा करण्यात व्यस्त असल्याने त्यांचे सलमानच्या बोलण्याकडे लक्ष गेले नाही. त्यावर दीपिका आणि प्रियांका आता हॉलिवूडचे चित्रपट करीत आहेत. त्यामुळे त्यांना भारतीय चित्रपटांबद्दल काही देणंघेण राहिलेल नाही , असे सलमान विनोदीपणे म्हणाला.