भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या टी २० सामन्यात भारताने ८ गडी राखून विजय मिळवला. दुसऱ्या टी २० सामन्यावर ‘महा’ वादळाचे सावट होते. मात्र त्या वादळाचा कोणताही अडथळा न येता सामना सुरळीत पार पडला. उलट पहिल्या सामन्यात विजय मिळवणाऱ्या बांगलादेशच्या संघाला या सामन्यात हिटमॅन वादळाचा तडाखा बसला. रोहितच्या ८५ धावांच्या खेळीच्या बळावर भारताने सामना जिंकला आणि मालिकेत १-१ अशी बरोबरी केली.
भारताच्या विजयात रोहित शर्माचे योगदान होते. त्यासोबत रोहितच्या फटकेबाजीच्या वेळी दुसऱ्या बाजूला शांत आणि संयमी धवननेही महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने २७ चेंडूत ४ चौकार लगावत ३१ धावा केल्या. पण सध्या धवनच्या फलंदाजीची नव्हे, तर त्याच्या अभिनयाची चर्चा सुरू आहे. धवनने आपल्या इन्स्टाग्रामवर एक झकास व्हिडीओ अपलोड केला आहे. त्या व्हिडीओमध्ये धवनने ‘हाऊसफुल ४’ चित्रपटातील अक्षय कुमारच्या बाला या भूमिकेची नक्कल केली आहे.
‘हाऊसफुल ४’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. त्या चित्रपटातील अक्षय कुमारच्या बाला या भूमिकेची प्रचंड चर्चा झाली. त्याच्या भूमिकेत तो विसरभोळा दाखवला आहे. तशीच नक्कल धवन त्याच्या व्हिडीओमध्ये करताना दिसतो आहे.
दरम्यान, सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. लिटन दास (२९), मोहम्मद नईम (३६), सौम्या सरकार (३०) आणि मोहम्मदुल्लाह (३०) यांच्या छोटेखानी खेळींच्या सांघिक कामगिरीच्या बळावर बांगलादेशने २० षटकात ६ बाद १५३ धावांपर्यंत मजल मारली आणि भारतापुढे १५४ धावांचे आव्हान ठेवले. भारताकडून चहलने सर्वाधिक २ बळी टिपले.
या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि शिखर धवन या सलामी जोडीने शतकी (११८) भागीदारी केली. धवनने २७ चेंडूत ४ चौकार लगावत ३१ धावा करून माघारी परतला. रोहितने मात्र फटकेबाजी सुरूच ठेवली. शतकाच्या नजीक पोहोचताना तो ८५ धावांवर माघारी परतला. त्याने ६ चौकार आणि ६ षटकार लगावत केवळ ४३ चेंडूत ८५ धावा कुटल्या. अखेर श्रेयस अय्यरने धडाकेबाज खेळी करत १३ चेंडूत नाबाद २४ धावा केल्या आणि भारताला विजय मिळवून दिला.
