संगीताला भाषेच्या सीमा नसतात, याची प्रचिती नुकत्याच पार पडलेल्या ‘इंडियन आयडॉल’च्या ९ पर्वात पाहायला मिळाली. सोनी टीव्हीवर रंगलेल्या ९ व्या पर्वातील ‘इंडियन आयडॉल’ या लोकप्रिय गाण्याच्या स्पर्धेत हैद्राबादचा एल. रेवंथ गायनाच्या मंचावर धम्माल सादरिकरण करत या स्पर्धेचा विजेता ठरला. रविवारी रंगलेल्या ‘इंडियन आडॉल’च्या नवव्या पर्वात रेवंतला विजेता घोषित करण्यात आले. ‘इंडियन आयडॉल’च्या मंचावर रंगलेल्या ग्रॅण्डफिनाले सोहळ्यात पी.व्ही एन. रोहित आणि खुदा बक्श यांच्यापेक्षा चांगले सादरिकरण करत त्याने ‘इंडियन आयडॉल’चा किताब पटकविला. या कार्यक्रमामध्ये सोनू निगम, अनु मलिक आणि फराह खान यांनी समीक्षक म्हणून काम पाहिले. विशेष म्हणजे या अंतिम सोहळ्यात क्रिकेटचा देव अर्थात सचिन तेंडूलकर देखील उपस्थित होता.
https://twitter.com/shoaib2095/status/848588088389636097
तर कपिल शर्माच्या सोनी या वृत्तवाहिनीवर प्रसारित होणाऱ्या ‘द कपिल शर्मा शो’ मधून काढता पाय घेतलेला सुनील ग्रोवरही या रंगारंग कार्यक्रमात रंगल्याचे पाहायला मिळाले. या कार्यक्रमामुळे आज म्हणजे रविवारी प्रसारित होणारा द कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमाला सुट्टी देण्यात आली होती. कपिलच्या सुट्टीच्या दिवशी सोनीच्या व्यासपीठावर सुनील ग्रोवरने महशूर गुलाटीच्या अवतारात उपस्थितांचे मनोरंजन केले. ‘ इंडियन आयडॉलचा’ विजेता ठरलेल्या रेवंथने दाक्षिणात्या चित्रपटसृष्टीत आतापर्यंत जवळपास २०० गाणी गायली आहेत. बहुचर्चित अशा ‘बाहुबली : बिगिनिंग ‘ या दाक्षिणात्या भाषेतील चित्रपटातील एका गाण्यालाही रेवंथने आवाज दिला आहे. विजयानंतर रेवंथ व्यासपीठावर भावनिक झाल्याचे पाहायला मिळाले. विजयानंतर आपल्या भावना व्यक्त करताना रेवंथ म्हणाला की, ‘ मी गाण्यामध्ये चांगलाच सक्रिय होतो. मात्र, मला आतापर्यंत संधी मिळाली नव्हती. म्हणून मी या कार्यक्रमात सहभागी झालो होतो. या स्पर्धेत विजयी होईल, असे कधीच वाटले नव्हते. सचिनकडून ट्रॉफी मिळाल्याचा अधिक अभिमान वाटतो, असेही तो म्हणाला.