मुंबईत बाइकवरून जाणाऱ्या दोघांनी मला बघून ‘करोना’ म्हणून हाक मारली. लोकांच्या अशा वागण्याचा खूप त्रास होतो, असा धक्कादायक अनुभव ‘इंडियन आयडॉल’ फेम गायक व अभिनेता चँग मियांगने सांगितला. जगभरात करोना विषाणूची दहशत पसरली असताना लोकांकडून किमान मी संवेदशनशील वागणुकीची अपेक्षा करतो, असं तो म्हणाला.

‘बॉम्बे टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत चँग म्हणाला, “माझ्या कुटुंबातील तीन पिढ्यांचा भारतातच जन्म झाला. माझा जन्म धनबाद येथे झाला. माझे पूर्वज चीनचे होते. पण मी भारतीय आहे. ज्या लोकांना मला चायनीज म्हणून चिडवायचंय, त्यांनी मला खुशाल चिडवावं, पण त्यापुढे भारतीय हा शब्द जोडावा.”

आणखी वाचा :बिग बींपासून अलका कुबलपर्यंत सेलिब्रिटींकडून टाळा-थाळ्यांचा गजर

काही जणांनी सोशल मीडियावरही चँगला करोना व्हायरल म्हटल्याचं त्याने सांगितलं. इतकंच नाही तर चँगपासून लांब राहा, असंही त्याचे मित्र बोलतात. या सर्व गोष्टींमुळे भावना दुखावत असल्याचं चँगने सांगितलं.

कोण आहे चँग मियांग?

‘इंडियन आयडॉल ३’मध्ये चँगने भाग घेतला होता. हा शो तो जिंकू शकला नव्हता, मात्र त्यानंतर त्याला सूत्रसंचालनाची बरीच कामं मिळाली. चँगने ‘बदमाश कंपनी’, ‘सुलतान’, ‘भारत’, ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’ या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.