पुलित्झर पुरस्कार विजेत्या पत्रकार-लेखिका इसाबेल विल्करसन यांच्या ‘कास्ट - द ओरिजिन्स ऑफ अवर डिसकन्टेन्ट्स’ या पुस्तकावर आधारित ‘ओरिजिन’ या डय़ुवेर्ने दिग्दर्शित चित्रपटाचा प्रीमिअर नुकताच ८०व्या प्रतिष्ठित व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पार पडला. भारताच्या दृष्टीने हा चित्रपट दोन गोष्टींसाठी महत्त्वाचा ठरतो. जातिभेदाचे भूत आणि वर्तमानकाळातील वास्तव जगभरात कसे एकसमान आहे याकडे लक्ष वेधत त्यामागच्या कारणांचा चित्रभाषेत वेध घेणाऱ्या चित्रपटात आपल्याकडील दलित समाजाचीही कथाव्यथा मांडण्यात आली आहे. या अनुषंगाने पहिल्यांदाच हॉलीवूडपटात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख, त्यांचा विचार मांडण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय विचारवंत डॉ. सूरज एंगडे हे या चित्रपटाचे सहनिर्माते, सल्लागार आणि अभिनेते अशा तिहेरी भूमिकेतून ‘ओरिजिन’शी जोडले गेले आहेत. ‘ओरिजिन’ या चित्रपटातील बाबासाहेबांचा उल्लेख आणि त्याच्याशी पहिल्यांदाच एका भारतीय अभ्यासकाचे जोडले जाणे या दोन्ही गोष्टी कशा जुळून आल्या याबद्दल बोलताना डॉ. सूरज एंगडे यांनी इसाबेल विल्करसन यांच्या पुस्तकाकडे लक्ष वेधलं. ‘इसाबेल यांच्या ‘कास्ट - द ओरिजिन्स ऑफ अवर डिसकन्टेन्ट्स’ या पुस्तकात माझा संदर्भ होता. मी गेली कित्येक वर्ष आपल्याकडील बहुजन समाज, जातिव्यवस्था यांच्याबरोबरीने आफ्रिकन अमेरिकन समाज, तेथील जातजाणिवा, विस्थापित कामगार याविषयी अभ्यास-संशोधन केलेलं आहे. माझ्या अभ्यासाचा संदर्भ या पुस्तकात होता. त्यामुळे एव्हा डय़ुवेर्ने यांनी जेव्हा पुस्तकावर आधारित चित्रपटाची तयारी सुरू केली तेव्हा साहजिकच माझ्याशी संपर्क साधला. मी या विषयातील जाणकार असल्याने चित्रपटासाठी सल्लागार आणि सहनिर्मात्याची भूमिका स्वीकारावी ही एव्हाची इच्छा होती. आणि माझीच व्यक्तिरेखा पुस्तकात असल्याने ती अन्य कलाकाराने करण्याऐवजी मीच साकारावी असे त्यांनी सुचवल्याने या तिन्ही भूमिकेतून मी चित्रपटाच्या प्रक्रियेत सक्रिय होतो’, असे सूरज यांनी सांगितले. हेही वाचा >>> मैत्रीतल्या जांगडगुत्त्याची विनोदी कथा जातीय विचारांचा डंख आजही जगभरात अनुभवाला येतो, हा विषय समाजातून पूर्णपणे संपलेला नाही याची जाणीव करून देणारा ‘ओरिजिन’ हा एका आफ्रिकन अमेरिकन महिलेचा चित्रपट व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित केला जाऊ नये यासाठी अर्ज भरण्यापासूनच अनेक अडथळय़ांची शर्यत एव्हा यांना पार करावी लागली. अखेर या महोत्सवात चित्रपट प्रदर्शित करणाऱ्या त्या पहिल्या कृष्णवर्णीय दिग्दर्शिका ठरल्या आहेत. एव्हा यांनी पहिल्यांदा बाबासाहेबांना हॉलीवूडपटात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे हेही वैशिष्टय़पूर्ण आहे, असे सूरज यांनी सांगितले. एव्हा यांना बाबासाहेबांविषयी फारशी माहिती नव्हती, मात्र त्यांची माहिती घेता घेता भव्यदिव्य प्रतिमेपलीकडे असलेलं बाबासाहेबांचं कार्य त्यांच्या लक्षात आलं, असं सांगतानाच ‘ओरिजिन’मध्ये बाबासाहेबांच्या लहानपणीचे संदर्भ घेण्यात आले आहेत, अशी माहितीही सूरज यांनी दिली. या वर्षांच्या अखेरीस ‘ओरिजिन’ हा चित्रपट भारतीय प्रेक्षकांना पाहायला मिळण्याची शक्यता आहे. भिन्न प्रांत, भिन्न काळातील जातिभेद एकच अमेरिका, भारत आणि जर्मनी या तीन भिन्न देशांमध्ये वेगवेगळय़ा काळांत जातिभेदाच्या अन्याय्य व्यवस्थेमुळे एक मोठा समाज नाहक नाडला गेला. या देशांमध्ये असलेला वंशवाद, वर्णवाद, वर्चस्ववाद या सगळय़ाच्या मुळाशी असलेल्या जातजाणिवा, उच्च-नीचतेचे समाजनियम हे एकमेकांपेक्षा निराळे नाहीत, त्यातील साधर्म्य दाखवून देतानाच नाझी जर्मनीचा काळ, दक्षिण युनायटेड स्टेट्समधील जिम क्रो कायद्यामुळे कृष्णवर्णीय समाजाच्या वाटय़ाला आलेल्या यातना आणि भारतातील दलित समाजाची अवहेलना यावर लेखिका इसाबेल यांनी भाष्य केले आहे. एव्हा यांनी पुस्तकातील विषयाच्या गाभ्याला धक्का न लावता खुद्द लेखिकेच्या व्यक्तिरेखेसह काही मूळ व्यक्तिरेखा आणि काल्पनिक व्यक्तिरेखा, संवाद, घटना यांची सांगड घालत ‘ओरिजिन’ चित्रपटाची मांडणी केली आहे, अशी माहिती सूरज यांनी दिली. हा चित्रपट व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवण्यात आला तेव्हा चित्रपटाच्या संपूर्ण तंत्रज्ञ-कलाकारांच्या डोळय़ांत अश्रू उभे राहिले होते. चित्रपटाशी संबंधित लोकांची ही अवस्था होती, तर प्रेक्षकांची भावावस्था काय झाली असेल याची तुम्ही कल्पना करू शकता.. असेही त्यांनी सांगितले.