‘ज्युरासिक पार्क’ या हॉलिवूडपटाच्या मालिकेतील ‘ज्युरासिक वर्ल्ड’ या चौथ्या चित्रपटात अभिनेता इरफान खान महत्वपूर्ण भूमिका साकारणार असून, हवाईमध्ये लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. चित्रीकरणासाठी अमेरिकेला जाण्यापूर्वी एका वृत्तसंस्थेशी बोलताना इरफान म्हणाला, कॉलिन ट्रेव्वोरो यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाची निर्मिती स्टिव्हन स्पिलबर्ग करीत आहेत. चित्रपटाच्या पहिल्या टप्प्यातील चित्रीकरण हवाईमध्ये होणार असून, संपूर्ण मे महिना मी अमेरिकेत रहाणार आहे. चित्रपट आणि चित्रपटातील आपल्या भूमिकेविषयी अधिक माहिती न देणाऱ्या इरफानने चित्रपटात आपण पार्कच्या मालकाची भूमिका साकारत असल्याचे सांगत, चित्रपट या वर्षाअखेरीस चित्रपटगृहात झळकणार असल्याची आशा व्यक्त केली.
याआधी इरफानने ‘दी अमेझिंग स्पायडर-मॅन’, ‘स्लमडॉग मिलियनर’, ‘अ मायटी हार्ट’ आणि अन्य काही आंतरराष्ट्रीय चित्रपटांमधून भूमिका साकारल्या आहेत. अलिकडेच त्याला दुबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘दी लंचबॉक्स’ चित्रपटातील भूमिकेसाठी उत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. सुजित सिरकरच्या ‘पिकु’ चित्रपटात इरफान खान महानायक अमिताभ बच्चन यांच्याबरोबर अभिनय करताना दिसणार आहे.