भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. आलिया भट्टच्या राझी सिनेमामुळे सानिया चर्चेत आली आहे. आता तुम्ही म्हणाल की, आलिया भट्टच्या राझी सिनेमाचा आणि सानियाचा काय संबंध? पण हा संबंध आम्ही नाही तर नेटिझन्सनी जोडला आहे. राझी सिनेमात आलिया एका काश्मिरी मुस्लिम मुलीची भूमिका साकारत आहे, जिचे लग्न एका पाकिस्तानी मुलासोबत होते. या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर अशी अफवा पसरत होती की, राझी सिनेमाची कहाणी सानिया मिर्झाच्या आयुष्यावर बेतलेली आहे. यावर सानियाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन उत्तर दिले आहे.
एका ट्विटर अकाऊंट युझरने ट्विट करत म्हटले की, ‘आलिया भट्टच्या ‘राझी’ सिनेमाची कथा एक अशा भारतीय मुलीची आहे जिचे पाकिस्तानी मुलाशी लग्न होते. पण तरीही ती भारतासाठी काम करते. त्यामुळे हा सिनेमा सानिया मिर्झाचा बायोपिक आहे.’ या ट्विटचे उत्तर देताना सानियाने लिहिले की, ‘उम्ममम, मला नाही वाटत तसं.’ सानियाने या ट्विटमध्ये एका इमोजीचाही वापर केला.
Ummm.. I think not https://t.co/6gSfMHTHVd
— Sania Mirza (@MirzaSania) April 10, 2018
हरिंदर सिक्का यांच्या ‘कॉलिंग सहमत’ या कादंबरीवर राझी सिनेमाची कथा बेतलेली आहे. या सिनेमाची कथा सत्य घटनेवर आधारीत आहे. १९७१ मध्ये भारत- पाकिस्तान यांच्यातील युद्धाच्या वातावरणात सहमत एका पाकिस्तानी अधिकाऱ्याशी लग्न करते. ट्रेलरमध्ये आलियाचे एक आज्ञाधारक मुलगी, कुटुंबवत्सल पत्नी आणि निर्भीड गुप्तहेर असे वेगवेगळे पैलू पाहायला मिळतात. तर विक्की कौशलही त्याच्या व्यक्तिरेखेमध्ये खुलून दिसतो. ‘फिलहाल’ आणि ‘तलवार’ सिनेमांचे दिग्दर्शन केलेल्या मेघना गुलझारने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धूरा सांभाळली आहे. या सिनेमाचे चित्रीकरण कश्मीर, पंजाब आणि मुंबईमध्ये झाले असून येत्या ११ मे रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.