जवळजवळ १६ वर्षांनंतर दिग्दर्शक जे पी दत्ता यांनी ‘बॉर्डर’ या त्यांच्या प्रसिद्ध युद्धपटाचा सिक्वल बनवण्याचा निर्णय घेतला आहे. सिक्वलमध्ये देखील सनी देओलची भूमिका असणार आहे. या चित्रपटातील सनी देओलच्या सहभागाची घोषणा करतांना आम्हाला खूप आनंद होत असून, अन्य कलाकारांच्या नावावर विचारविनिमय सुरू आहे. सनी हा ‘बॉर्डर’ चित्रपटाचा महत्वपूर्ण भाग असल्याने त्याच्यासाठी प्रमुख भूमिका बनविण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
१९९७ मध्ये आलेला ‘बॉर्डर’ हा चित्रपट १९७१ च्या युद्धातील वास्तविक घटनांवर आधारित होता. ‘बॉर्डर’ चित्रपटात सनी एका शीख कमांडिंग अधिका-याच्या भूमिकेत दिसला होता. परंतु, सिक्वलमध्ये तो कमांडिंग अधिका-याच्या भूमिकेत दिसणार असला, तरी या वेळेस तो शीखाच्या रूपात दिसणार नाही. ऑक्टोंबर महिन्याच्या अखेरीस ‘बॉर्डर २’ च्या कामाला सुरूवात होणार आहे.