माहितीचा स्त्रोत म्हणून पाहिला जाणारा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो म्हणजे ‘कौन बनेगा करोडपती.’ बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन या शोचे सूत्रसंचालन करताना दिसतात. बऱ्याच वेळा ते हॉटसीटवर बसलेल्या स्पर्धकांशी गप्पा मारताना त्यांच्या जीवनातील किस्से सांगताना दिसतात. ‘कौन बनेगा करोडपती’च्या आगामी भागामध्ये बॉलिवूडचा भीडू अर्थात अभिनेता जॅकी श्रॉफ आणि सुनील शेट्टी हजेरी लावणार आहेत. दरम्यान जॅकी श्रॉफने ‘भीडू’ ही टपोरी भाषा बोलण्यामागील कारण सांगितले आहे.

सोनी वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर केबीसीच्या आगामी भागाचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये जॅकी श्रॉफ आणि सुनील शेट्टी हॉट सीटवर बसल्याचे दिसत आहे. दरम्यान बिग बी जॅकी श्रॉफ यांना ‘भीडू एक प्रश्न विचारायचा आहे… ही जी भीडू भाषा आहे ती तू कशी शिकलास?’ असा प्रश्न विचारला. त्यावर जॅकी श्रॉफ यांनी दिलेल्या उत्तराने सर्वांनाच धक्का बसला.

जॅकी श्रॉफ म्हणाले, ‘सर, सर्वात पहिले आपण राहात असलेला भाग आणि दुसरे म्हणजे तुम्ही.’ ते ऐकून बिग बी आश्चर्यचकित झाले. त्यानंतर बिग बींनी त्यांचा अमर अकबर अँथेनी चित्रपटातील डायलॉग रिक्रिएट केला आणि म्हणाले, ‘ऐसा तो आदमी जीवन में दो समय भागता है, ऑलिंपिक का रेस हो, या पुलिस का केस हो. तुम किस लिए भाग रहा है भाई?’

‘कौन बनेगा करोडपती’मधील हा प्रोमो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. हा भाग २४ सप्टेंबर रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे. बिग बी, जॅकी श्रॉफ आणि सुनील शेट्टी यांना एकत्र पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.