‘जलीकट्टू’ ऑस्करमधून बाद

‘बिट्टू’ हा लघुपट मात्र पुढच्या फेरीत

(संग्रहित छायाचित्र)
 

भारताने ऑस्कर स्पर्धेसाठी पाठवलेला ‘जलीकट्टू’ हा चित्रपट बाद झाला आहे. फीचर फिल्म प्रवर्गातून हा चित्रपट बाद झाला असला, तरी उत्कृष्ट लघुपट प्रवर्गात ‘बिट्टू’ हा लघुपट पुढच्या फेरीत गेला आहे.

जलीकट्टू हा मल्याळम भाषेतील चित्रपट लिजो जोस पेलीसेरी यांनी दिग्दर्शित केलेला असून पहिल्या १५ चित्रपटांत त्याचा समावेश होऊ शकला नाही. आता या १५ चित्रपटांतून पाच चित्रपटांची निवड केली जाणार आहे, असे अ‍ॅकडॅमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अँड सायन्सेस या संस्थेने बुधवारी पहिल्या फेरीतील निवड जाहीर करताना म्हटले आहे.

थॉमस व्हिंटरबर्ग यांचा ‘अ‍ॅनदर राउंड’ हा चित्रपट पहिल्या पंधरामध्ये असून त्यात मॅडस मिकेल्सन याची भूमिका आहे. आंद्रे कोचालोव्हस्की यांचा ‘डिअर कॉमरेड्स’ हा रशियन चित्रपट स्पर्धेत कायम असून अ‍ॅग्नीझका हॉलंड यांचा शार्लटन हा झेकोस्लोव्हाकियाचा चित्रपटही शर्यतीत आहे तर रोमानियाचा ‘कलेक्टिव्ह’ चित्रपटही पहिल्या पंधरात आहे. इतर स्पर्धकात बोस्निया हझ्रेगोव्हिनाचा ‘को व्हादिस आयदा’, ग्वाटेमालाचा ‘ला लोरोना’, हाँगकाँगचा ‘बेटर डेज’, इराणचा ‘सन चिल्ड्रेन’, आयव्हरी कोस्टचा ‘नाइट ऑफ द किंग्ज’, मेक्सिकोचा ‘आय अ‍ॅम नो लाँगर हिअर’, नॉर्वेचा ‘होप’, तैवानचा ‘द सन’, टय़ुनिशियाचा ‘द मॅन हू सोल्ड हिज स्कीन’ यांचा समावेश आहे.

९३ देश या प्रवर्गात पात्र होते. दरम्यान, करिष्मा देव दुबे यांनी दिग्दर्शित केलेला ‘बिट्टू’ हा लघुपट पुढच्या फेरीत पोहोचला आहे. दा यी, फीलिंग थ्रू, दी ह्य़ूमन व्हॉइस. दी किक्सलेड कॉयर, दी लेटर रूम, दी प्रेझेंट, टू डिस्टंट स्ट्रेंजर्स, दी व्हॅन व व्हाइट आय हे लघु चित्रपट पहिल्या दहामध्ये आहेत.

यापूर्वी आशुतोष गोवारीकर यांचा ‘लगान’ हा चित्रपट २००१ मध्ये अंतिम फेरीत जाऊन बाद झाला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Jallikattu dropped out of the oscars abn