ज्यांचा सहवास, ज्यांचं मायेचं आणि मार्गदर्शनाचं छत्र कधीच आपल्या डोक्यावरून काढून घेतलं जाणार नाही अशा आश्वस्त विश्वाला अकस्मात तडा जाऊन क्षणार्धात ते नाहीसं झाल्यावर माणसाची जी अवस्था होते, तीच स्नेहलचीही झाली होती. प्रौढावस्थेत पोहचूनही स्नेहल नेहमी ‘बाबांची मुलगी’च राहिली होती. आणि आज अचानक ध्यानीमनी नसताना त्यांचं छत्र डोक्यावरून नाहीसं झालं होतं. लहानपणापासून बाबांनाच घरातले कर्तेकरविते म्हणून पाहण्याची सवय लागलेली. कारण आई स्किझोफ्रेनियाच्या आजारामुळे सहसा माणसांत नसेच. त्यामुळे तेच आई आणि बाबांची भूमिका निभावताना स्नेहलने पाहिलेलं. बाबांसारखा खंबीर आणि अष्टावधानी माणूस होता म्हणूनच केवळ आईच्या या आजाराची फारशी झळ तिला आणि मोठय़ा भावाला लागली नाही. त्यांनी जसं मुलांचं पालनपोषण आणि संगोपन केलं तसंच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त काळजी त्यांनी स्किझोफ्रेनियाच्या आजाराने ग्रस्त असलेल्या बायकोची घेतली. आणि आजवर ते घेत आलेले होते.
अशा बाबांच्या निधनामुळे स्नेहल कोलमडून न पडती तरच आश्चर्य! त्यात स्नेहलचा नवरा सुधीर मर्चन्ट नेव्हीत असल्याने आणि मुलगा सौरभ शिक्षणानिमित्ताने दूर असल्याने ती अगदीच एकटी, एकाकी झाली होती. तशात भाऊही अमेरिकेत. त्यामुळे स्किझोफ्रेनियाग्रस्त आईची जबाबदारी स्वाभविकपणेच तिच्यावर आलेली. बाबांनी ज्या खंबीरपणे आईला सांभाळलं तसं आपल्याला तेही एकटीला जमेल का, या विचारानं ती आणखीनच धास्तावलेली. तशी इन्नी (मावशी) होती म्हणा मदतीला, पण तिलाही तिच्या जबाबदाऱ्या आहेतच. मग कसं जमणार हे सारं आपल्याला? पण जमवायला हवं. आईला आता दुसरा कुठला आधार आहे आपणाशिवाय?
स्नेहल आईला आपल्या घरी आणते खरी, पण तिचं अचानक हिंसक होणं आणि आवरता न आवरणं याची तिला भीतीच बसलेली होती. त्यामुळे तिनं इन्नीला होता होईतो आपल्याकडेच राहा असा आग्रह धरलेला. इन्नीही त्याला राजी झाली. पण आई जेव्हा हिंस्र होई तेव्हा दोघींचीही त्रेधा तिरपीट उडे. त्यात स्नेहल भावनिकदृष्टय़ा आईशी कधीच जोडली गेलेली नसल्याने तिला तिचं सारं करताना कर्तव्यभावनाच अधिक जाणवत असे. पण जेव्हा ती ‘नॉर्मल’ असे तेव्हा सारं सुरळीत असे.
अशात एके दिवशी बोलता बोलता आई स्नेहलता सहजपणे सांगते की, ‘तू दामूकाकांची मुलगी आहेस असं हे म्हणत असत. मलाही दामूकाका आवडत.’ तिच्या या गौप्यस्फोटानं स्नेहलच्या पायाखालची जमीनच जणू कुणी तरी काढून घेतल्यासारखं तिला होतं. ज्या बाबांची मुलगी म्हणून आपण वाढलो, मोठे झालो, ज्यांच्याखेरीज आपल्याला दुसरं विश्व नव्हतं, ते बाबा आपले खरेखुरे बाबा नव्हते? या बाईचं नक्कीच डोकं फिरलेलं आहे, ती खोदून खोदून आईला विचारत राहते. आणि तीही तेच उत्तर देत राहते. स्नेहलचं डोकं भणाणतं. आपण आईच्या व्यभिचारातून जन्माला आलोय, ही कल्पनाच तिला असह्य होते. स्वत:चीच शिसारी येऊ लागते. आणि एवढं भयंकर सत्य बाबांनी आपल्यापासून दडवून ठेवलं आणि तरीही ते आपल्यावर सदैव प्रेम करत राहिले. कुठल्या मातीचा बनला होता हा माणूस?
आणि.. आणि म्हणूनच ते आपल्याला अनाथाश्रमात घेऊन जायचे का? तिथल्या मुलांवर मायेची पाखर घालताना त्यांच्या मनात मीही (एक अनाथ मुलगी!) असायचे का? काय.. सत्य काय होतं? मी त्यांची खरी मुलगी नसताना त्यांनी मला ते कधी साधं जाणवूही दिलं नाही.
पण मी त्यांची मुलगी नाही, हे कसं काय शक्य आहे? मग आम्ही दोघं इतके अभिन्न जीव कसे? नाही. हे खोटं आहे. मी त्यांचीच मुलगी आहे.
पण मग आई सांगतेय ते तिच्या स्किझोफ्रेनिक अवस्थेत की तिच्या अंतर्मनात दामूकाका वसलेले असल्यानं तिला तसं वाटत असावं? इन्नीलाच विचारायला हवं- हे दामूकाका कोण? कुठे असतात? काय करतात? शक्य झाल्यास त्यांना गाठायला हवं, जाब विचारायला हवा!
इन्नी स्नेहलला, ‘आईनं तुला जे सांगितलं ते खरं नाही,’ असं ठासून सांगते. पण तरीही स्नेहलच्या मनातला संशयात्मा शांत होत नाही. तिला आपलं जन्मरहस्य काही झालं तरी जाणून घ्यायचं असतं. बाबा डायऱ्या लिहीत हे तिला आठवतं. घरी जाऊन ती बाबांच्या सगळ्या डायऱ्या आणते आणि आपल्या जन्मादरम्यानच्या वर्षांतल्या त्यातल्या नोंदी शोधू लागते. पण काही संदिग्ध विधानांखेरीज आणि मधल्या काळातल्या कोऱ्या पानांखेरीज काहीच हाती लागत नाही. बाबांनी जणू त्या घटनांबद्दल मौन पाळलं होतं.
त्यांच्या या मौनानं स्नेहलचा संशय आणखीन दुणावतो. ती दामूकाकांचा शोध घ्यायचा निश्चयच करते. त्यासाठी ती आकाशपाताळ एक करते. इन्नी तिच्या या शोधातलं वैयथ्र्य तिच्या ध्यानी आणून द्यायचा खूप प्रयत्न करते. पण व्यर्थ! स्नेहलला आपले खरे बाबा कोण, हे जाणून घेतल्याशिवाय स्वस्थता लाभणार नसते.
आईने आपल्या व्यभिचाराची कबुली दिल्यानंतर स्नेहल आणि तिच्यातला अंतराळ आणखीनच वाढत जातो, तिला डोळ्यांसमोर धरणंही स्नेहलला नको वाटतं. आई-मुलीतील या दुराव्यानं इन्नीही अस्वस्थ होते. काय करावं, तिलाही समजत नाही. स्नेहलचा जिद्दी स्वभाव पाहता तिला सत्य काय, हे कळल्याशिवाय ती स्वस्थ बसणार नाही हेही ती जाणून असते.
स्नेहलला आपलं जन्मरहस्य कळतं का? दामूकाका तिला सापडतात का? त्यांच्यात काय संभाषण होतं? त्यातून वास्तव उघड होतं का?. या प्रश्नांची उत्तरं प्रत्यक्ष नाटकात शोधणंच इष्ट.
लेखक डॉ. आनंद नाडकर्णी यांनी हे मनोविश्लेषणात्मक सस्पेन्स थ्रिलर नाटक अत्यंत सफाईनं विणलं आहे. मानसोपचारतज्ज्ञ असल्याने मानवी मनोव्यापार आणि वैद्यक वास्तव यांच्यातला अगम्य खेळ त्यांना या कामी उपयोगी पडला आहे. विशेषत: मानवी वर्तनाचा त्यांचा अभ्यास नाटकात पदोपदी जाणवतो. फक्त काही ठिकाणी त्यांनी नाटय़ात्म स्वातंत्र्य घेतलेलं आहे; जेणेकरून नाटकात सुलभीकरण येतं. कदाचित नाटय़ांतर्गत तिढा सोडवणं त्यांना अन्यथा शक्य झालं नसतं. असं असलं तरी भावनिक-मानसिक संघर्ष उत्कर्षबिंदूप्रत नेण्यात ते यशस्वी झाले आहेत. मानवी मनातील सूक्ष्म आंदोलनांचा वापर त्यांनी चपखलपणे केलेले आढळतो.
दिग्दर्शक व प्रकाश योजनाकार कुमार सोहोनी यांनी हे मनोविश्लेषक नाटक सहजतेनं हाताळलं आहे. त्यामुळे नाटय़पूर्ण क्षण धारदार करण्यात ते यशस्वी झाले आहेत. त्यामुळे नाटक सुरुवातीचे काही क्षण सोडता प्रेक्षकांची पकड घेतं ते शेवटपर्यंत! पात्रांच्या परस्परसंबंधांतले ताणेबाणे त्यांनी प्रयोगात चांगलेच अधोरेखित केलेले आहेत. विशेषत: स्नेहल आणि आई यांच्यातील प्रेम-तिरस्काराचं नातं! इन्नीच्या रूपात आणि नंतर बाबांच्या आत्म्याच्या रूपात लेखकाचं जीवनविषयक तत्त्वज्ञान अलवारपणे येतं. फक्त स्किझोफ्रेनिक आई या पात्राला दिग्दर्शकाने दिलेले मॅनरिझम व जेश्चर्स वेडेपणाकडे झुकणारे आहेत. स्किझोफ्रेनिक  व्यक्ती ‘नॉर्मल’ असताना असे वेडेवाकडे हावभाव करेल हे संभवत नाही.
अशोक पत्की यांनी पाश्र्वसंगीतातून यातले तणावपूर्ण प्रसंग अधोरेखित केले आहेत. तर अजय पुजारे यांनी नेपथ्यातून नाटकाची मागणी पुरवली आहे. प्रकाश निमकर यांनी वेशभूषेतून आणि संतोष पेडणेकर यांनी रंगभूषेद्वारे आई या पात्राला बाह्य अस्तित्व प्रदान केले आहे. आपल्या जन्मरहस्याच्या शोधास्तव वेडीपिशी झालेल्या स्नेहलची तडफड, तगमग आणि बेचैनी इला भाटे यांनी प्रत्ययकारितेनं व्यक्त केली आहे. आईच्या गौप्यस्फोटाने हादरलेली, त्यातून आईचा तिरस्कार करू लागलेली आणि अखेरीस सत्य काय, हे जाणल्यानंतर शांत, समंजस, प्रगल्भ झालेली स्नेहल.. हा प्रवास त्यांनी उत्कटपणे केला आहे. एकीकडे कर्तव्यभावना आणि दुसरीकडे भावनिक कुतरओढ यांतलं द्वंद्व त्यांनी अप्रतिम दाखवलं आहे. आई झालेल्या अमिता खोपकर यांनी स्किझोफ्रेनिक रुग्णांची क्षणोक्षणी बदलणारी भावावस्था अचूक टिपली आहे. परंतु जेश्चर आणि मॅनरिझममुळे त्या वेडय़ा वाटतात. त्यांचं नॉर्मल अवस्थेतलं बोलणंही त्यामुळे मनोरुग्णाईतासारखं वाटतं. वसुधा देशपांडे यांनी इन्नीच्या भूमिकेत चोख साथ दिली आहे. गुरुराज अवधानी यांनी प्रगल्भ, समंजस, मायाळू बाबांचा आब भारदस्तपणे पेलला आहे. अजिंक्य दातेंचा अरुणही लोभस! गंभीर आशयाचं नाटय़पूर्ण आणि खिळवून ठेवणारं ‘जन्मरहस्य’ एकदा तरी अनुभवायला हरकत नाही.

family members
मनातलं कागदावर: साधू या सूरतालाशी लय!
old generation, new generation
सांधा बदलताना : नव्यातले जुने…
Priyadarshni Rahul
हुंड्याविरोधात असाही लढा! लग्न मोडल्यानंतर तिने घडवली ‘अशी’ अद्दल, कायद्याचा अभ्यास अन् १४ वर्षे लढा!
Spiritual guru and founder of the Isha Foundation, Sadhguru Jaggi Vasudev, has undergone emergency brain surgery
मोठी बातमी! अध्यात्मिक गुरु जग्गी वासुदेव यांच्यावर तातडीची मेंदू शस्त्रक्रिया