अभिनेता, गायक, संगीतकार, दिग्दर्शक, निर्मिता अशा विविध क्षेत्रांमध्ये अफलातून काम करत प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या किशोर कुमार यांची आज जयंती आहे. या निमित्ताने सोशल मीडियापासून टीव्हीवरील विविध कार्यक्रमांपर्यंत सर्वत्रच या गायकाच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. चित्रपटसृष्टीतील सर्वांत यशस्वी व्यक्तिमत्व म्हणून किशोरदांकडे पाहिलं जातं. दरम्यान अशा या महान व्यक्तीमत्वावर सुप्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी देखील कौतुकाचा वर्षाव केला आहे. “किशोरदांसारखा ना कोणी होता, न कोणी होणार” असं म्हणत त्यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

अवश्य पाहा – अभिनेत्याने तृतीयपंथीकडे मागितले डान्स केल्याचे पैसे; व्हिडीओ होतोय व्हायरल…

अवश्य पाहा – नैराशावर अशी करा मात? अभिनेत्रीने एक मिनिटाच्या फिल्ममध्ये सांगितले उपाय

जावेद अख्तर किशोर कुमारांसोबतचा एक जुना फोटो पोस्ट करुन त्यांची स्तुती केली आहे. “किशोर कुमार यांची आज जयंती आहे. किशोरदा तुमच्या सारखा ना कोणी होता ना कोणी होणार. कोट्यवधी चाहते आहेत ज्यांना दररोज तुमची आठवण येते. मी देखील त्यांच्यापैकीच एक आहे.” अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलं आहे. त्यांचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

चित्रपटसृष्टीतील एक यशस्वी पार्श्वगायक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किशोर कुमार यांनी त्यांच्या कारकिर्दीत असंख्य गाणी गायली. हिंदी सोबतच त्यांनी मराठी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, भोजपुरी, मल्याळम अशा विविध भाषांमध्येदेखील गाणी गायली.