दुसऱ्याच्या आनंदातून जगण्याचा अर्थ!

दुसऱ्याच्या आनंदातून आपल्या जगण्याचा अर्थ नव्याने शोधण्याचा अनुभव देणारा असा चित्रपट आहे.

रेश्मा राईकवार

‘प्रवासात माणूस जुन्याचा नवा होतो’, असा संवाद ‘झिम्मा’ चित्रपटातील नायकाच्या तोंडी आहे. चित्रपटात घडणारा त्या पात्रांचा प्रवास आणि त्या प्रवासात त्यांचं नवं होत जाणं पहात प्रेक्षकालाही ताजंतवानं करण्याचा करिश्मा दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी या चित्रपटातून साधला आहे. दुसऱ्याच्या आनंदातून आपल्या जगण्याचा अर्थ नव्याने शोधण्याचा अनुभव देणारा असा चित्रपट आहे.

भिन्न आर्थिक, सामाजिक – वैचारिक स्तरातील स्त्रियांचं एकत्र येणं, त्यांचं एकमेकींना समजून घेणं, त्यांचा आपापसातील संवाद आणि या सगळय़ा प्रक्रियेतून आतल्या आत होत जाणारी घुसळण हा सगळा भाग चित्रपटातून प्रेक्षकांपर्यंत सहजपणे पोहोचवणं हे या चित्रपटाचं वैशिष्टय़ ठरलं आहे. युरोपच्या टूरवर निघालेला एक ग्रुप आणि त्यांना टूरवर नेणारा त्यांचा आयोजक असा हा प्रवास सुरू होतो. टूर आयोजक असलेल्या कबीरचा (सिद्धार्थ चांदेकर) हा पहिलाच अनुभव आहे. त्याच्या कंपनीची ही पहिलीच टूर आणि त्यातही सगळय़ा बायका.. हा विचारच त्याचा थरकाप उडवणारा आहे. त्यामुळे त्याच्या नेतृत्वाखाली युरोपमध्ये आलेल्या बायकांची काय गोष्ट विचारता? मात्र इथे टूरवर आलेल्या मिता, इंदू आज्जी, मैथिली, कृत्तिका, वैशाली, रमा, निर्मला या सगळय़ाच जणी अत्यंत हुशार आणि काळाचं भान असलेल्या आहेत. त्या मुळातच इतक्या समर्थ आणि वय-विचारांचं अंतर सहज पार करून आपापसात जुळवून घेणाऱ्या असल्याने कबीरला फारशी अडचण येत नाही; पण अनेकदा माणूस जेवढा एकमेकांच्या जवळ येतो, एकमेकांना समजायला लागतो तेव्हा आपल्याच मूळ स्वभावाला फाटे फुटतात. अपेक्षा वाढायला लागतात आणि छोटय़ा-मोठय़ा वादाच्या ठिणग्या उडायला लागतात. तसंच इथेही काहीसं होतं. त्यामुळेच असेल कदाचित ‘झिम्मा’चा हा अंतर्बाह्य बदलायला लावणारा प्रवास आपल्यालाही तितकाच जवळचा, खरा वाटतो.

मुळात अशा कथेत इतक्या व्यक्तिरेखा आल्यानंतर, त्यांच्याबरोबर प्रत्येकीची एक स्वतंत्र कथा येते. मग ते सगळे धागे एकत्र जोडून घेणं अनेकदा गुंतागुंतीचं ठरतं आणि बऱ्याचदा लेखनातच हे नाटय़ फसतं. इथे भावभावनांचे हे सगळे धागे एकत्रित घट्ट बांधून घेत आपल्याला जे पोहोचवायचं आहे ते अगदी सहज आणि थेट भिडेल अशा पद्धतीने मांडणं याचं पूर्ण श्रेय लेखिका इरावती कर्णिक यांना द्यायला हवं. असे काही प्रसंग या चित्रपटात आहेत, जिथे आता काही तरी मोठं भांडण होणार असं आपल्याला वाटतं, मात्र तसं खरंच काही होत नाही. या चित्रपटातली पात्रं आपल्या मूळ स्वभावाप्रमाणे यातून सहज आपला मार्ग शोधतात. ज्या काळात आपण जगतो आहोत त्याचं भान असणं, आपल्याला आयुष्यात काय हवं आहे याबद्दल स्पष्टता असलेल्या वेगवेगळय़ा वयांतील आणि परिस्थितीतील स्त्रिया पहायला मिळणं ही लेखिकेची देणगी आहे. या उत्तम कथेला त्याच पद्धतीने हाताळण्याची किमया दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी साधली आहे.

चित्रीकरणापासून ते व्यक्तिरेखांच्या असण्या-दिसण्यापर्यंत कुठेही भडकपणा नाही. आपण काही तरी वेगळं, भन्नाट सांगण्याचा प्रयत्न करतो आहे असा भावही या मांडणीत नाही की शहाणपणा शिकवण्याचा आव आणलेला नाही. सहज-साधे संवादही तुम्हाला विचार करायला लावतात. तुटेपर्यंत संपलं आहे का सगळं? हा कबीरने मैथिलीला विचारलेला प्रश्न असेल किंवा आपणच आपल्यावर बंधनं घालून घेतलेली असतात, हे निर्मलाला आलेलं शहाणपण. हे संवाद पाहणाऱ्यालाही आपल्या आयुष्यात डोकावून पाहायला भाग पाडतात. उत्तम कलाकारांची फौज.. सोनाली कुलकर्णी, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले यांनी ज्या सहजतेने आजची तरुणी साकारली आहे तितक्याच किंवा त्याच्यापेक्षा काकणभर जास्त सहजतेने सुहास जोशी यांनी इंदू साकारली आहे. साहेबांसमोर डोक्यावर पदर घेऊन वावरणारी, पण एकटीलाच सहलीला जायचं आहे सांगण्याचं धाडस करू पाहणारी, बदल अनुभवण्यासाठी सतत तयार असलेली निर्मिती सावंत यांनी साकारलेली निर्मलाही अफलातून आहे. सुचित्रा बांदेकर यांची वैशाली तर खूप स्त्रियांना आपल्यातलीच एक वाटेल. खूप दिवसांनी मितासारख्या वेगळय़ा व्यक्तिरेखेत अभिनेत्री क्षिती जोगला पाहण्याची संधीही या चित्रपटाने दिली आहे आणि या सगळय़ांना एकत्र बांधून ठेवणाऱ्या कबीरच्या भूमिकेत सिद्धार्थ चांदेकर एकदम फिट आहे. लहानांपासून मोठय़ांपर्यंत सगळय़ांना सहजपणे भिडणारा हा ‘झिम्मा’ड आनंदानुभव आहे.

झिम्मा

दिग्दर्शक – हेमंत ढोमे, कलाकार – सोनाली कुलकर्णी, सुहास जोशी, निर्मिती सावंत, सायली संजीव, क्षिती जोग, मृण्मयी गोडबोले, सुचित्रा बांदेकर, सिद्धार्थ चांदेकर, अनंत जोग

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Jhimma movie review by reshma raikwar zws

ताज्या बातम्या