प्रियदर्शन जाधव दिग्दर्शित चोरीचा मामला या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा रंगत आहे. या चित्रपटामध्ये जितेंद्र जोशी, अमृता खानविलकर,हेमंत ढोमे,अनिकेत विश्वास राव अशी मल्टीस्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. काही दिवसापूर्वी या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. हा टीझर पाहिल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढली आहे. त्यातच आता चित्रपटाचा भन्नाट ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. विशेष म्हणजे हा ट्रेलर खळखळून हसविणारा आहे.

एका चोरीमुळे होणारी गुंतागुंत या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. चित्रपटाची संकल्पनाच मजेशीर आहे, त्यात प्रासंगिक विनोद, खुमासदार संवादांचा तडका या कथानकाला मिळाला आहे. त्याशिवाय ताल धरायला लावणारं संगीत हेही चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे. या चित्रपटामुळे प्रेक्षकांना पूरेपूर मनोरंजन मिळणार हे ट्रेलरवरून स्पष्ट होत आहे.

एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट प्रस्तुत आणि स्वरुप स्टुडिओजच्या सहकार्याने सुधाकर ओमाळे, आकाश पेंढारकर, सचिन नारकर, विकास पवार, स्मिता ओमाळे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. प्रियदर्शन जाधवने या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. अभिनेत्री अमृता खानविलकर, जितेंद्र जोशी, हेमंत ढोमे, कीर्ती पेंढारकर, अनिकेत विश्वासराव आणि क्षिती जोग अशी स्टारकास्ट या चित्रपटात आहे. येत्या ३१ जानेवारीला हा धमाल, विनोदी चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.