चित्रपट व मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडणारा ‘डब्ल्यू. डब्ल्यू. ई.’ सुपरस्टार जॉन सीना समाजमाध्यमांवर सध्या फारच चर्चेत आहे. लवकरच तो आपली प्रेयसी निकी बेलाबरोबर लग्नबंधनात अडकणार अशा चर्चा रंगल्या होत्या. नुकत्याच पार पडलेल्या ‘रेसलमेनिया’ या ‘डब्ल्यू.डब्ल्यू.ई’च्या सर्वात मोठय़ा कार्यक्रमात जॉन व निकी यांनी आपल्या लग्नाची घोषणादेखील केली होती. परंतु लग्नाच्या तारखेआधी तीनच आठवडय़ांपूर्वी दोघांनी विवाहबंधनात न अडकता एकमेकांपासून विलग होण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांनीही ट्विटरवरून आपल्या ब्रेकअपची बातमी चाहत्यांना दिली.

निकी बेला ही ‘प्ले बॉय’ नियतकालिकाची कव्हर मॉडेल व ‘डब्ल्यू.डब्ल्यू. ई.’ रेसलर आहे. २०१२ साली एका मिक्स मॅच फाइटमध्ये जॉन सीनाने निकीला लग्नासाठी मागणी घातली होती. त्यानंतर गेली ६ वर्षे हे जोडपे अनेक कार्यक्रमांमधून हातात हात घालून मिरवताना दिसले. निकीची लहान बहीण ब्री बेलाच्या लग्नानंतर लगेचच आठवडय़ाभरात दोघांनी साखरपुडादेखील उरकला होता. तेव्हापासून चाहत्यांना त्यांच्या लग्नाची आस लागली होती. परंतु अचानक झालेल्या या ब्रेकअपमुळे चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. खरे पाहता जॉन व निकी या दोघांचेही हे काही पहिले ब्रेकअप नाही. दोघांनीही २००३ साली ‘डब्ल्यू.डब्ल्यू.ई.’ कार्यक्रमात खेळाडू म्हणून प्रवेश केला. तेव्हापासून त्यांचे अनेकांबरोबर संबंध राहिले आहेत. विशेषत: जॉन सीना कधीही हार न मानणाऱ्या अ‍ॅटिटय़ूडसाठी ओळखला जातो. पण त्याचबरोबर त्याने मिकी जेम्स, व्हिक्टोरिया, एजे ली, एलिझाबेथ हबरडे यांसारख्या अनेक अभिनेत्रींबरोबर घालवलेल्या क्षणांचीही चर्चा जोरदार केली जाते. हीच बाब जशीच्या तशी निकी बेलालाही लागू पडते. तिनेही आजवर ड्वेन जॉन्सन, शॉन मायकल, रोमन रेन्स, डेव्हिड ओटेंगा यांसारख्या अनेक अभिनेत्यांबरोबर आपले संबंध होते अशी कबुली अनेकदा स्वत:च समाजमाध्यमांवरून दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या पाश्र्वभूमीवर विचार करता २०१२ साली दोघांनी जेव्हा एकत्र राहण्याचा निर्णय घेतला तेव्हा खरे तर अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या होत्या. त्यांचे प्रेमप्रकरण ‘डब्ल्यू.डब्ल्यू.ई. ’मालिकेच्या पटकथेचाच एक भाग आहे की काय?, हा प्रश्न चाहत्यांना पडला होता. परंतु पुढे साखरपुडा व लग्नाची घोषणा केल्यानंतर मात्र हे प्रेम खरे आहे, असा विश्वास चाहत्यांना बसला. पण गमतीशीर बाब म्हणजे आता पुन्हा एकदा दोघांनी लग्न मोडले आहे. त्यामुळे आता ते कोणाशी लिंकअप करणार हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.