गेल्या पाच वर्षांत स्टार प्रवाहवरील ‘पुढचं पाऊल’ ही मालिका कायमच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसली. आतापर्यंत या मालिकेनं तब्बल दोन हजार भाग पूर्ण केले असून या मालिका आता एका रहस्यमयी वळणावर येऊन पोहोचली आहे. मालिकेत करारी व्यक्तिमत्वाच्या अक्कासाहेब सुनेच्या पाठीशी कायमच खंबीरपणे उभ्या राहिल्या. मग सुनेचं शिक्षण असो किंवा पुनर्विवाह… त्यांनी कायम चांगल्या गोष्टी करण्याला प्राधान्य दिलं. पुरोगामी विचारांतून स्वत:चं वेगळेपण निर्माण केलं. तर, कल्याणीही अक्कासाहेबांसारखीच कणखर, अनेक अडचणी येऊनही त्याला धीरानं सामोरी गेलेली. आपल्या कुटुंबाच्या हिताचा विचार करणारी कल्याणी. मात्र, आता अक्कासाहेबांच्या कुटुंबात अघटित घडणार आहे.
सासू-सुनेच्या नात्यावर आधारित मालिकांमध्ये स्टार प्रवाहवरील ‘पुढचं पाऊल’ ही मालिका कायमच वेगळी ठरली आहे. बदला घेण्यासाठी अधीर झालेल्या बाब्याच्या हल्ल्यात कल्याणी आणि अक्कासाहेब यांच्यापैकी कोणीतरी बळी जाणार आहे. आपलं कुटुंब उदध्वस्त झाल्याच्या रागातून बाब्यानं अक्कासाहेबांच्या विरोधात सूड घेण्याचं ठरवलं आहे. त्यानं बदला घेण्याचा प्लॅन केला आहे. अक्कासाहेबांना मारण्यासाठी तो तयार आहे. मात्र, बाब्याचा प्लॅन कल्याणीला कळतो आणि अक्कासाहेबांना वाचवण्यासाठी कल्याणी त्यांच्यापर्यंत पोहोचते. बाब्यानं झाडलेल्या गोळीला अक्कासाहेब बळी पडतात की कल्याणी हा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या पाच वर्षांपासून महाराष्ट्रानं उदंड प्रेम केलेल्या या मालिकेच्या कथानकातलं एक महत्त्वाचं पर्व संपणार अशी चिन्ह आहेत.