सुपरस्टार रजनीकांत यांच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘काला’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रजनीकांत यांच्या जावयाने म्हणजेच अभिनेता धनुषने या चित्रपटाची निर्मिती केली असून तामिळ, तेलुगू आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये तो प्रदर्शित होणार आहे. या ट्रेलरमध्ये एकीकडे रजनीकांत तर दुसरीकडे नाना पाटेकर यांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहायला मिळते.

यामध्ये रजनीकांत ‘काला’ची भूमिका साकारत असून नाना पाटेकर यांच्यासोबत त्यांचा झोपडपट्टीतल्या जमिनीवरून वाद होतो. अभिनेत्री हुमा कुरेशी यात ४५ वर्षीय महिलेची भूमिका साकारत असून तरुणपणी ‘काला’चं तिच्यावर प्रेम असल्याचं दाखवलं आहे. ट्रेलरची सुरुवातच नानांच्या संवादाने होते. झोपडपट्टीतल्या रहिवाशांना ते संबोधत असतात. त्यानंतर थलैवा रजनीकांतची धमाकेदार एण्ट्री होते. गँगस्टरची भूमिका साकारणाऱ्या रजनीकांत यांचं त्या झोपडपट्टीत वर्चस्व असतं तर हरिनाथ देसाईची भूमिका साकारणाऱ्या नानांना तिथे अतिक्रमण करायचं असतं.

या चित्रपटात दोन मोठे कलाकार असल्याने चाहत्यांमध्ये त्याची फारच उत्सुकता आहे. पीए.रंजित दिग्दर्शित हा चित्रपट ७ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.