अभिनेत्री कंगना रणौत व चित्रपट निर्माता, दिग्दर्शक करण जोहर यांच्यातील वाद जगजाहीर आहे. बॉलिवूडमधील घराणेशाहीवरून कंगनाने अनेकदा करणवर ताशेरे ओढले. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने पुन्हा एकदा करणवर गंभीर आरोप केले आहेत. करणच्या गँगने समीक्षकांना पैसे देऊन माझ्या चित्रपटांविरोधात लिहिण्यास भाग पाडले, असा आरोप कंगनाने केला आहे.

‘मुंबई मिरर’ला दिलेल्या मुलाखतीत कंगना म्हणाली, ‘करण जोहरच्या गँगमधील लोकांनी माझ्या मणिकर्णिका चित्रपटाच्या सेटवरील लाकडी घोड्यावर मी स्टंट करत असतानाचा व्हिडिओ व्हायरल केला. कारण मी जिथे सराव करत होती तिथेच ती लोकंसुद्धा घोडेस्वारीचा सराव करण्यासाठी आले होते. लाकडी घोडा फक्त क्लोज अप दृश्यांसाठीच वापरला होता. तरीसुद्धा त्यांनी तो व्हिडिओ काढला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला. मी रंगून चित्रपटातसुद्धा घोडेस्वारी केली होती. त्यामुळे मला ही गोष्ट काही नवीन नव्हती. तरीसुद्धा माझ्यावरील ईर्ष्येमुळे त्यांनी माझी बदनामी केली.’

आणखी वाचा : ‘बिग बॉस’च्या घरात पराग व रुपालीच्या लग्नाची तयारी?

करण जोहरवर आरोप करत ती पुढे म्हणाली, ‘काही चित्रपट व्यापार विश्लेषकांना माझ्या चित्रपटांची कमाई जेवढी झाली होती त्याच्याहून निम्म्याने दाखवण्याची सक्ती करण्यात आली होती. करण जोहरच्या गँगकडून ही मोहीमच हाती घेण्यात आली होती. माझ्या चित्रपटांविषयी चांगले न लिहिण्यासाठी समीक्षकांना पैसे देण्यात आले होते.’

कंगनाच्या या आरोपांवर आता करण जोहर काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.