कंगना रणौत सध्या फार आनंदी आहे. तिच्या आनंदाचं कारणही खास आहे. ती मावशी झाली आहे. तिची बहिण रंगोली चंदेलने आज सकाळी मुलाला जन्म दिला. नवजात बाळाचे फोटो रंगोलीने तिच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. तिने मुलाचे नाव पृथ्वी राज चंदेल असे ठेवले आहे. पृथ्वीचे फोटो शेअर करुन माझा छोटासा मुलगा असे ट्विट तिने केले.

तान्हुल्याच्या आगमनाने सध्या रणौत आणि चंदेल परिवार फार खुश आहेत. आपल्या भाच्याला घेतलेल्या फोटोत कंगना कधी दिसेल असाच प्रश्न आता तिच्या चाहत्यांना पडला आहे. कंगनाची बहिण रंगोली प्रत्येक बाबतीत आपल्या बहिणीच्या पाठिशी ठामपणे उभी राहते. कंगनाबद्दल कोणीही अपशब्द वापरले तर रंगोली नेहमीच ट्विटरच्या माध्यामातून त्यांच्याविरोधात बोलताना दिसते. पण आजपासून रंगोलीचा एक नवीन प्रवास सुरू झाला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या कंगना आणि हृतिकच्या वादत रंगोलीने आपल्या बहिणीची साथ दिली होती. तिने हृतिकला कंगना आणि त्याच्या नात्याबद्दल ट्विटरवरच अनेक प्रश्न विचारले होते. हृतिकने त्याच्या एका वक्तव्यात म्हणाला होता की त्याची मुलं रेहान आणि हृदान तसेच त्याची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खान यांच्या आयुष्यावर त्याचा परिणाम होत होता त्यामुळे या प्रकरणात त्याने स्वत:ची भूमिका मांडण्याचा निर्णय घेतला.