‘सिमरन’ या चित्रपटानंतर अभिनेत्री कंगना रणौत तिच्या आगामी ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झाँसी’च्या चित्रीकरणात व्यग्र आहे. जयपूरमध्ये या ऐतिहासिक चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असून सेटवरील काही फोटो समोर आले आहेत. यामध्ये कंगना झाशीची राणी लक्ष्मीबाईच्या वेशात दिसत असून तिच्या हातात तलवारही पाहायला मिळत आहे. याआधीही तिचे झाशीच्या राणीच्या वेशातील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या नवीन फोटोंमध्ये भव्यदिव्य सेटदेखील पाहायला मिळत आहे.
सध्या जयपूरमधील अंबर किल्ल्याजवळ चित्रीकरण सुरू असून हैदराबादमधील रामोजी फिल्म सिटीमध्येही काही भाग चित्रीत करण्यात आला. कंगनाला या वेशात पाहून प्रेक्षकांमधील या चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढली आहे. कंगनाने बऱ्याच स्त्रीप्रधान भूमिका असलेल्या चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झाँसी’ या चित्रपटामुळे तिच्या या यादीत आणखी एका भूमिकेची भर पडली आहे.
चित्रपटामध्ये कंगनाव्यतिरिक्त अतुल कुलकर्णी, वैभव तत्ववादी, अंकिता लोखंडे हे प्रसिद्ध चेहरेही दिसणार आहेत. मात्र, त्यांच्या भूमिकांबद्दलची फारशी माहिती अद्याप मिळालेली नाही. या चित्रपटाच्यानिमित्ताने रुपेरी पडद्यावर मर्दानी झाशीच्या राणीचे धाडसी रुप पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे हे खरे. पुढच्या वर्षी २७ एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होईल.



