काही दिवसांपूर्वी ‘क्वीन’ सिनेमाचा दिग्दर्शक विकास बहलवर एका तरुणीने लैंगिक अत्याचाराचा आरोप केला होता. या प्रकरणावर ‘क्वीन’ अभिनेत्री कंगना रणौतने मौन सोडलं. प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात, आपण एक बाजू ऐकली तर दुसरी बाजूही पडताळायला हवी, असं म्हणत कंगनाने विकासला पाठिंबा दर्शवला आहे. एका पत्रकार परिषदेत बोलताना कंगना म्हणाली, ‘आपण इथे एका ब्रॅण्डबद्दल बोलायला आलो आहोत. तुम्ही ज्याबद्दल प्रश्न विचारत आहात तो एक गंभीर विषय आहे. जी व्यक्ती अशा गोष्टींचा सामना करते आणि त्यावर स्पष्टपणे आपले मत मांडते ही एक धाडसाची गोष्ट आहे.’

कंगनाने या प्रकरणावर आपलं मत मांडत म्हटलं की, ‘अनेकदा असे काही घडले की, कुटुंब, मित्र- मैत्रीणी याबद्दल कुठेही बोलू नका असा सल्ला देतात. पण अशा गोष्टीत जवळच्यांनी पाठिंबा द्यायला हवा. पण प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात हे विसरुन चालणार नाही. गोष्ट बरोबर असो किंवा चूक पण याविषयावर मोकळेपणाने बोललं गेलं पाहीजे.’

‘फॅण्टम मूव्हिज’मधील एका महिला कर्मचाऱ्याने विकास बहलवर गेल्या आठवड्यात लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते. गेल्या दीड वर्षांपासून विकास अत्याचार करत असल्याचा दावा तिने केला आहे. विशेष म्हणजे फॅण्टममधील इतर भागीदार- मधू मँटेना, अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानी यांनी बहलसोबत संबंध तोडले आहेत.

काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक करण जोहरसोबत झालेल्या वादामुळेही कंगना चर्चेत आली होती. करणवर तिने घराणेशाहीचा आरोप केला. चिडलेल्या करणने ‘इतकाच त्रास होत असेल तर बॉलिवूड सोडून दे’ असा इशारा दिल्यानंतर ‘बॉलिवूड काय तुझी मक्तेदारी नाही ’ असे प्रत्युत्तर कंगनाने करणला दिले होते.

लवकरच कंगना राणी लक्ष्मीबाईची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. कंगनाने सिनेमातील भूमिकेसाठी घोडेस्वारीचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली असून हा सिनेमा केतन मेहता दिग्दर्शित करणार आहे.