गेल्या काही दिवसांमध्ये कंगना रणौत आणि हृतिक रोशन यांच्यात कोणतीही शाब्दिक चकमक न झाल्यामुळे त्यांच्यातील वाद मिटला आहे, असे अनेकांना वाटत होते. पण हा समज पूर्णपणे खोटा ठरला आहे. आता कंगना रणौतच्या वकिलाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये हृतिकने केलेल्या टिपण्यांवर तो उत्तर देताना दिसत आहे. हृतिकने रिपब्लिक टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, २०१३ नंतर तो कंगनाला गेल्या ९ वर्षांमध्ये कधीही भेटला नाही. हृतिकच्या या मुद्यावर आपले मत मांडताना कंगनाच्या वकिलाने काही पुरावे सादर केले ज्यात हृतिक कंगनाच्या बर्थडे पार्टीला हजर होता हे त्याने स्पष्ट केले.

वकिलाने उलट प्रश्न विचारताना म्हटले की, डिसेंबर २०१३ ते जानेवारी २०१४ मध्ये हृतिक कुठे होता हे स्पष्ट करण्यासाठी हृतिक त्याचा पासपोर्ट का दाखवत नाही? यूट्युबवर रिझवान सिद्दीकी या नावाने ४६ मिनिटे ४३ सेकंदाचा हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत ३ हजार लोकांनी पाहिला आहे. व्हिडिओच्या सुरूवातीला या प्रकरणाशी निगडीत अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. त्यानंतर हृतिकचा एक व्हिडिओही दाखवण्यात आला आहे, ज्यात हृतिक त्याची बाजू मांडताना दिसत आहे. यानंतर वकील हृतिकला प्रतिप्रश्न विचारताना दिसतो.

२०१६ मध्ये सुरू झालेले हे प्रकरण अजूनही न्यायप्रविष्ट आहे. कंगनाने हृतिकचे नाव न घेता त्याला ‘सिली एक्स’ असे म्हटले होते. यानंतर कंगनाने इंडिया टीव्हीच्या ‘आप की अदालत’ कार्यक्रमात तिने यावर सविस्तर भाष्य केले होते.