जेव्हा कंगना लॅक्मे फॅशन वीकच्या रॅम्पवर सेल्फी काढते

रॅम्पवॉक करताना तिने असे काही केले की ते पाहून लोकांना आश्चर्यच वाटले

‘रॅम्प’ आणि ‘फॅशन’ म्हटलं की अनेकांच्या विचाराची चक्र सुरु होतात ती थेट ‘लॅक्मे फॅशन वीक’च्या दिशेने. फॅशन जगतातील बहुप्रतिक्षित अशा या ‘लॅक्मे फॅशन वीक’ला नुकतीच मुंबईमध्ये सुरुवात झाली. डिझायनिंग आणि मॉडेलिंग क्षेत्रातील नवनव्या संकल्पनांची मांदियाळीच ‘लॅक्मे फॅशन वीक’मध्ये रॅम्पवर उतरते असे म्हणायला हरकत नाही.
तरुण तहिलिआनीच्या या कलेक्शनसाठी बॉलिवूडची क्वीन कंगना रणौत ‘शो स्टॉपर’ म्हणून रॅम्पवर आली आणि उपस्थितांना कंगनाचा रॅम्पवॉक अनुभवण्याची संधीच मिळाली.
यावेळी कंगनाने पारंपारिक आणि तितकाच मॉडर्न बाज असलेला सुरेख पोशाख परिधान केला होता. कंगनाच्या पोशाखात काळ्या रंगाच्या एका सॅटिन स्कर्टसह काळा टॉप आणि त्याला लाल रंगाच्या एका बंडीप्रमाणे दिसणाऱ्या जॅकेटची जोड देण्यात आली होती.
कंगनाला बॉलिवूडची ‘क्वीन’ बोलणं चुकीचं ठरणार नाही. स्वबळावर सिनेमे हिट करते आणि जे काही करते त्यात स्वतःची अशी छाप सोडल्याशिवाय राहत नाहीत. लॅक्मे फॅशन वीकमध्येही रॅम्पवॉक करताना तिने असे काही केले की ते पाहून लोकांनी बोटंच तोंडात घातली. याआधी कोणत्याही फॅशन शोमध्ये असे कोणी केले नव्हते ते या क्वीनने सहज केले.
कंगना रॅम्पवर चालत असताना थोड्या वेळाने तिने सेल्फी काढायला सुरुवात केली. सेल्फीचे अॅडिक्शन अनेकांना असतच. यात कंगनाही मागे नाही. रॅम्पवॉक करत असताना बिंदास्तपणे सेल्फी घ्यायला सुरुवात केली. त्यामुळे तिचे कपडे, मेकअप आणि स्टाइल यांच्याशिवायही तिच्या सेल्फींचीच चर्चा अधिक झाली. थोड्या वेळाने डिझायनर तरुण तहिलिआनीनेही कंगनासोबत रॅम्पवर सेल्फी काढल्या.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Kangna ranaut shocked the audience at lakme fashion week by taking selfies on the ramp