कन्नड फिल्म इंडस्ट्रीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री सौजन्याचे निधन झाले आहे. बंगळुरू येथील राहत्या घरात गळफास घेऊन सौजन्याने आत्महत्या केली आहे. तिने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिली होती. सौजन्याच्या निधनानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. अनेक कलाकार सोशल मीडिया पोस्टद्वारे तिला श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत.
सौजन्या बंगळरुमधील कुंबलगोडू परिसरातील एका इमारतीमध्ये राहत होती. तिने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या नोटमध्ये तिच्या आत्महत्येस कुणीही जबाबदार नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे सौजन्याने आत्महत्या का केली? याचा तपास पोलीस करत आहेत. नोटमध्ये सौजन्याने कुटुंबीयांची माफी मागितली आहे. ही सुसाईट नोट सौजन्याने २७ सप्टेंबर रोजी लिहिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सौजन्या नैराश्याचा सामना करत होती. यासंदर्भातील माहिती तिने नोटमध्ये दिली आहे. या प्रकरणी पोलीस सौजन्याचे कुटुंबीय आणि मित्रमैत्रीणींची चौकशी करत आहेत. नोटमध्ये सौजन्याने तिला कोणताही आजार नसल्याचे म्हटले आहे पण तणावात असल्याचे तिने सांगितले. या कठीण काळात मदत करणाऱ्या सर्वांचे तिने आभार मानले आहेत.
सौजन्याने आजवर अनेक दाक्षिणात्य मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिच्या सोबत काम करणाऱ्या लोकांची देखील चौकशी पोलीस करत आहेत. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री जयश्री रमैया आणि चैत्र कूटूरने आत्महत्या केली होती. आता त्यांच्या पाठोपाठ सौजन्याने आत्महत्या केल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.