कपिल शर्मा सध्या त्याचा आगामी सिनेमा ‘फिरंगी’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. बुधवारी तो प्रमोशनसाठी अहमदाबादला गेला होता. इथे सिनेमाचे प्रमोशन करत असताना एक वेगळीच घटना त्याच्यासोबत घडली. कपिलचा एक चाहता त्याला भेटून एवढा भावूक झाला की तो त्याच्यासमोरच रडायला लागला. त्याने कपिलला घट्ट मिठी मारली आणि तो रडतच होता. त्याने कपिलला काही भेटवस्तूही दिल्या. स्वतः कपिलने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती दिली. त्या चाहत्यासोबत आपला फोटो शेअर करताना कपिलने लिहिलं की, ‘मला तुझं नाव माहित नाही. पण तू दिलेल्या भेटवस्तूंसाठी खूप आभार. पुन्हा केव्हा तरी भेटूच.’

कपिलच्या या फोटोवर त्याच्या अनेक चाहत्यांनी नानाविध प्रतिक्रिया दिल्या. काहींनी कपिलसोबतचे फोटो शेअर केले. त्याच्या चाहत्यांनी कमेंट करत म्हटले की, जेव्हा आम्ही तुम्हाला पहिल्यांदा भेटलो तेव्हा त्या मुलाप्रमाणे आमचीही तिच अवस्था होती. कपिलचे देशभरात लाखो चाहते आहेत. कपिलने लवकरात लवकर टीव्हीवर पुनरागमन करावे अशी त्यांची इच्छा आहे.

कपिल आणि इशिता दत्ता यांची मुख्य भूमिका असलेला ‘फिरंगी’ हा सिनेमा आज प्रदर्शित झाला. इशिताने काही दिवसांपूर्वी लग्न केल्याने ती सिनेमाच्या प्रमोशनपासून काही काळ दूर होती. इशिताने अभिनेता वत्सल सेठशी २९ नोव्हेंबरला लग्न केले. प्रमोशनमध्ये व्यग्र असल्यामुळे कपिल या लग्नाला उपस्थित राहू शकला नव्हता. पण त्याने इशिताला फोन करुन लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. असे म्हटले जाते की, या सिनेमाच्या प्रदर्शनानंतर काही दिवसांनी कपिल पुन्हा टीव्हीकडे स्वतःचा शो घेऊन वळणार आहे.