एकेकाळी ‘द कपिल शर्मा शो’ हा टीआरपीमध्ये अग्रणी होता. या शोला दुसरा कोणताही शो असूच शकत नाही असे वाटत होते. दरम्यान कपिल आणि अभिनेता सुनील ग्रोवरमध्ये वाद झाला आणि त्यांची टीम फुटली. त्यानंतर प्रत्येक गोष्ट ही कपिलच्या विरोधातच जात होती. या काळात कपिल नैराश्यग्रस्त ही होता. त्याचा ‘फिरंगी’ हा सिनेमाही बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटला होता. पण झालं गेलं मागे टाकत कपिल पुन्हा एकदा जोमाने कामाला लागला आहे. छोट्या पडद्यावर दणक्यात पुनरागमन करायला तो सज्ज झाला आहे. त्याचा नव्या शोचे नाव ‘फॅमिली विथ कपिल शर्मा’ असे असणार आहे. या शोबद्दल त्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण असतानाच एक चिंताजनक बातमी समोर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कपिल सोशल मीडियावर फार सक्रिय आहे. तो अनेकदा त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करुन त्याच्या आयुष्यातील घडामोडींबद्दल चाहत्यांना माहिती देत असतो. पण नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडिओमुळे तो स्वतःच अडचणीत आला आहे. त्याचे झाले असे की, कपिलने शेअर केलेल्या व्हिडिओत तो अमृतसरच्या रस्त्यावर बुलेट बाईक चालवताना दिसत आहे. ‘डीएनए’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, एका विद्यार्थी संघटनेने या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष केशव कोहली याने कपिल विरोधात तक्रार दाखल केली आहे.

केशवच्या तक्रारीनुसार, कपिल हा युथआयकॉन आहे. तो जसा वागतो तसेच त्याचे चाहते वागण्याचा प्रयत्न करतात. यामुळेच त्याने वाहतूक नियमांचं पालन करायला हवे. पण, कपिल हेल्मेट न घालताच बाईक चालवत आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कपिल शर्मा विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी, आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत कपिल म्हणाला की, ‘मी ऐकलं होतं की प्रसिद्ध असण्याचे जेवढे फायदे आहेत तेवढेच तोटेही आहेत. आता मला कळलं आहे की कोणत्या गोष्टी मनाला लावून घ्यायच्या नाहीत. सतत काम करत राहणं महत्त्वाचं. अनेकांकडे ऐकवायला फक्त चांगल्याच गोष्टी असतात असे नाही, प्रत्येकाच्या आयुष्यात चढ- उतार हा असतोच. फक्त कलाकारांचा वाईट काळ लोकांसमोर येतो हाच काय तो फरक.’

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kapil sharma fir riding bike without helmet before new show family time go on screen
First published on: 17-02-2018 at 17:32 IST