दिग्दर्शक- निर्माता करण जोहरचा रेडिओ शो सध्या चांगलाच चर्चेत आहे. ‘कॉलिंग करण’ या शोमधून तो श्रोत्यांच्या रिलेशनशिप, अफेयरमधील समस्यांवर तोडगा काढण्यासाठी सल्ले देतो आहे. शोमध्ये एका श्रोत्याला सल्ला देत असताना करणला त्याच्या भूतकाळातील एक कटू प्रसंग आठवला. करणचे वडील दिवंगत यश जोहर निर्मित ‘मुकद्दर का फैसला’ हा चित्रपट जेव्हा बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला, तेव्हा त्यांना कर्ज फेडण्यासाठी आजीचे घर विकावे लागल्याचे करणने सांगितले.

‘त्यावेळी आम्ही दक्षिण मुंबईतील भाड्याच्या घरात राहत होतो. आम्हाला स्वत:चं घर विकत घ्यायचं होतं पण तेवढे पैसे आमच्याकडे तेव्हा नव्हते. माझे वडील त्यावेळी ‘मुकद्दर का सिकंदर’ या चित्रपटाची निर्मिती करत होते. पण याच चित्रपटाच्या वेळी ‘मिस्टर इंडिया’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यामुळे आमचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटला. जेव्हा आम्ही नवीन घर विकत घ्यायचं स्वप्न बघत होतो, त्याच वेळी मात्र चित्रपटाच्या अपयशामुळे आम्हाला उलट कर्ज फेडण्यासाठी आजीचं घर विकावं लागलं. त्यावेळी मला पैशांचे खरे मूल्य समजले,’ असं करण म्हणाला.

वाचा : १०० वर्षांच्या आजींकडून शेखर कपूर यांना मिळाली जगण्याची अनोखी प्रेरणा

रेडिओ जॉकी म्हणून करण श्रोत्यांच्या ‘लव्ह लाइफ’चे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतोय. बी-टाऊनला एकापेक्षा एक रोमॅण्टिक ऑनस्क्रीन जोड्या देणारा हा अवलिया रेडिओ शोमध्येही त्याचे अधिराज्य गाजवतोय, असे म्हणायला हरकत नाही.