अभिनेते राज कपूर यांनी ७० वर्षांपूर्वी बनवलेल्या आर. के. स्टुडिओची विक्री करण्याचा निर्णय कपूर कुटुंबियांनी घेतला आहे. त्यामुळे बॉलिवूडच्या प्रवासातील महत्त्वाचा साक्षीदार असलेला आर. के. स्टुडिओ आता इतिहासजमा होण्याची शक्यता आहे. हा स्टुडिओ विकण्याच्या निर्णयावर अभिनेत्री करिना कपूर खानने प्रतिक्रिया दिली आहे.

‘स्टुडिओ विकण्याच्या निर्णयाबाबत मला फारसं काही माहित नाही. कारण माझ्या शूटिंगच्या व्यग्र वेळापत्रकामुळे मी वडिलांना गेल्या चार-पाच दिवसांपासून भेटलीसुद्धा नाही. आर. के. स्टुडिओशी लहानपणापासूनच्या आमच्या आठवणी जोडल्या गेल्या आहेत. माझ्या कुटुंबियांनी जर तो विकण्याचा निर्णय घेतला असेल तर तो योग्यच असेल. माझे वडील आणि काका मिळून यासंदर्भातला योग्य तो निर्णय घेतील,’ असं मत करिनाने मांडलं आहे.

वाचा : क्रितीसोबतही पटेना; सुशांतचं पुन्हा ब्रेकअप

स्टुडिओच्या मेन्टेनन्सचा खर्च हा अधिक असून यातून मिळणारं उत्पन्न मात्र कमी असल्यामुळे हा निर्णय कपूर कुटुंबियांनी घेतल्याचे कळत आहे. कपूर कुटुंबियांनी स्टुडिओच्या विक्रीबाबत बिल्डर, डेव्हलपर्स आणि कॉर्पोरेट्ससोबत बोलणीदेखील सुरू केली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात आर. के. स्टुडिओला भीषण आग लागली होती. या भीषण आगीत स्टुडिओचं मोठं नुकसान झालं होतं. त्यामुळे स्टुडिओ पुन्हा उभा करणे मोठं खर्चिक आणि अशक्य असल्याने तो विकण्याचा निर्णय कपूर कुटुंबियांनी घेतला असल्याचं समोर येत आहे.