अभिनेत्री करिश्मा कपूर सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरीही तिच्या नावाच्या चर्चा बॉलिवूडमध्ये नेहमीच असतात. सध्या करिश्मा पुन्हा एकदा तिच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. करिश्मा कपूर आणि तिचा बहुचर्चित प्रियकर संदीप तोश्नीवाल यांच्यातील नात्यावरुन आता पुन्हा चर्चा रंगण्यास सुरुवात झाल्याचे दिसते. याचे कारण ही तसेच आहे. करिश्मा कपूरने संजय सोबत घटस्फोट घेतल्यानंतर आता करिश्माचा कथित प्रियकर म्हणजे तोश्नीवाल त्याच्या पत्नीपासून विभक्त होण्याच्या तयारीला लागला आहे. तोश्नीवालने पत्नी अर्शिता मनोरुग्ण असल्याचे सांगत तिच्यापासून वेगळे होण्यासाठी कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. कोर्टात त्याने घटस्फोटाचा अर्ज दाखल केल्याचे समजते. संदीप तोश्नीवाल आणि अर्शिता यांना ६ आणि ११ वर्षाच्या दोन मुली आहेत.
गेल्या काही काळापासून करिश्मा आणि संदीप एकमेकांसोबत जास्त वेळ घालवत असून संजय कपूरसोबतच्या वैवाहिक जीवनात आलेल्या वादळानंतर करिश्माला संदीपमध्ये चांगला मित्र मिळाला असल्याच्या चांगल्याच चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले होते. त्यांच्या वाढत जाणाऱ्या जवळकीमुळे लवकरच दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये येणार असल्याची माहिती देखील चर्चेचा विषय ठरली होती. करिश्मा आणि संदीप त्यांच्या नात्याला एक नवे वळण देऊ इच्छित आहेत. त्यामुळेच या दोघांनीही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये येण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात होते. यासाठी संदीप मुंबईतील वांद्रे येथे एका प्रशस्त घराच्या शोधात असल्याची माहिती देखील चर्चा होती. संदीपने सध्या त्याच्या पत्नीकडून घटस्फोट घेण्याच्या कायदेशीर प्रक्रियेला सुरुवात केली आहे.
तोश्नीवालच्या वकील तोबन इराणी यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यावसायाने डॉक्टर असणारी अर्शिता मानसिक आजाराने त्रस्त आहे. मानसिक संतुलन ढासळल्याने ती अनेकदा आक्रमक होते. ती मानसिक रुग्ण असल्याचा पुरावा आमच्याकडे आहे. मानसिक रुग्ण असल्याची निदान झाल्यानंतर अर्शिताने उपचार करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे तोश्नीवाल तिच्यापासून विभक्त होणार असल्याचे ते म्हणाले. स्पॉटब्वॉय संकेतस्थळाच्या वृत्तानुसार, बॉलिवूडमधील एका निर्मात्याने कोर्टामध्ये तोश्नीवालच्या बाजून जबानी दिली आहे. अर्शिताच्या जवळच्या मित्राने दिलेल्या माहितीनुसार संदीप सध्या घटस्फोटाच्या विचारात असला तरी अर्शिता त्याच्या या निर्णयावर समाधानी नाही. बॉलिवूडमध्ये संदीप आणि करिश्मा यांच्या प्रेमप्रकरणाच्या रंगणाऱ्या चर्चेमुळे करिश्मा कपूरसाठी संदीपने अर्शिताला मनोरुग्ण ठरवतोय का? असा सूर उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही. न्यायालयात अर्पिता काय बाजू मांडणार हे पाहणे देखील औत्सुकतेचे ठरणार आहे.