करिश्मा कपूरचा कथित प्रियकर आणि दिल्लीस्थित व्यावसायिक संदीप तोश्निवाल याला अखेर त्याच्या बायकोपासून घटस्फोट मिळाला आहे. गेल्या सात वर्षांपासून घटस्फोटाचा हा खटला सुरू होता. आता संदीपला घटस्फोट मिळाला असून, कपूर खानदानाचा जावई होण्याचे त्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

सोमवारी वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयात संदीपला त्याच्या ऑर्थोडोन्टिस्ट पत्नीकडून घटस्फोट मिळाला. संदीप आणि डॉक्टर अश्रिता यांनी १४ वर्षांचे नाते संपुष्टात आणले. रिपोर्टनुसार, संदिपने २०१० मध्ये घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. गेल्या ३ वर्षांपासून करिश्मा आणि संदिप हे रिलेशनशिपमध्ये आहेत.

गेल्या सात वर्षांपासून संदीप घटस्फोटासाठी प्रयत्न करत होता. अखेरीस या वर्षाच्या सुरुवातीला दोघांनी एकमताने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. यानंतर घटस्फोटाच्या प्रक्रियेला सुरूवात झाली. घटस्फोटामध्ये नमूद केलेल्या अटीनुसार, संदीपने त्यांच्या दोन्ही मुलींच्या पालनपोषणसाठी प्रत्येकी ३ कोटी रुपये द्यायचे. तसेच डॉक्टर अश्रिताला २ कोटी रुपये द्यायचे. याशिवाय अश्रिता राहत असलेले दिल्लीतील घरही तिच्या नावावर करायचे. दोन्ही मुली आईकडेच राहतील.

करिश्मानेही संजय कपूरसोबतच्या तिच्या नात्यात आलेल्या दरीनंतर गेल्यावर्षी घटस्फोट घेतला होता. संजयही दिल्लीतीर एक नावाजलेला व्यावसायिक आहे. दोघांनी २००३ मध्ये लग्न केले होते. घटस्फोटानंतर संजयने त्याची प्रेयसी प्रिया सचदेवशी लग्न केले. प्रियाचेही हे दुसरे लग्न आहे. याआधी प्रिया सचदेवने हॉटेलिअर विक्रम चटवालशी विवाह केला होता.