करोनाच्या संकटातून मार्ग काढायचा असेल तर घरात राहून त्याच्याशी सामना केला पाहिजे. त्यामुळे ३ मेपर्यंत देशात लॉकडाउन आहे. या बंदच्या काळात चित्रपट, मालिकांचं चित्रीकरण रखडल्यामुळे कलाकार आणि चाहत्यांची भेट होत नाहीये.त्यामुळे ही कलाकार मंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून थेट चाहत्यांशी संवाद साधत आहेत. यामध्ये कार्तिक आर्यनदेखील ‘कोकी पुछेगा’ या लाइव्ह चॅट शोमधून चाहत्यांशी संवाद साधत आहे. यामध्येच अलिकडे त्याने एका पोलिसांनी ‘बाहर जाओगे तो पिटोगे’ या वाक्यामागचा खरा अर्थ विचारला. त्यावर पोलिसांनी त्याला भन्नाट उत्तर दिल्याचं पाहायला मिळालं.
कार्तिक सध्या ‘कोकी पुछेगा’ या ऑनलाइन लाइव्ह चॅटच्या माध्यमातून काही सेलिब्रिटी, दिग्गज किंवा अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्यांशी संवाद साधताना दिसत आहे. यावेळी त्याच्या तिसऱ्या एपिसोडमध्ये मध्य प्रदेशच्या महिला पोलीस मधुरवीना या सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमात कार्तिकने मधुरवीना यांच्याशी करोना विषाणूविषयी संवाद साधला. तसंच दिवसरात्र ते जनतेसाठी झटत आहेत त्यावरही चर्चा केली. यामध्येच त्याने एक मजेशीर प्रश्न विचारला त्यावर मधुरवीना यांनीदेखील भन्नाट उत्तर दिलं. विशेष म्हणजे कार्तिकने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये प्रश्नामधील ती ओळ लिहीली आहे.
‘बाहर जाओगे तो पिटोगे’ या वाक्यामधील खरं फॅक्ट काय? असा प्रश्न कार्तिकने विचारला होता. त्यावर हे वाक्य म्हणजे फॅक्ट आहे. विनाकारण बाहेर पडाल तर नक्कीच मार पडेल, असं मधुरवीना यांनी सांगितलं. त्यांच्या म्हणण्यानुसार, आम्ही जनतेच्या काळजीपोटी त्यांना घरात राहण्याचं आवाहन करत आहोत. मात्र जर ते आदेशाचं आणि नियमांचं उल्लंघन करत असतील तर त्यांना नक्कीच मार पडेल.
दरम्यान, या कार्यक्रमाच्या माध्यमातून कार्तिक नागरिकांमध्ये करोना विषाणूविषयी जनजागृती करत आहे. त्यासोबतच त्याने गरजूंसाठी मदतीचा हातदेखील पुढे केला आहे. त्याने गरजूंसाठी १ कोटी रुपयांच्या आर्थिक मदत केली आहे.