बॉलिवूडमध्ये सध्या कतरिना कैफला यश हुलकावणी देताना दिसत आहे. तिच्या ‘फितूर’ आणि ‘बार बार देखो’ या चित्रपटाला प्रेक्षकांनी फारसा प्रतिसाद दिला नाही. परिणामी दोन चित्रपटात मिळालेल्या अपयशानंतर काही दिवसांपूर्वी एकापाठोपाठ चित्रिकरणामध्ये व्यस्त असणारी कॅटरिनाकडे नव्या ऑफरचे संकेत धुसर झाले आहेत. नुकतेच तिच्या ‘जग्गा जासूस या चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण झाले असून या चित्रपटात ती रणबीर सोबत झळकणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी एप्रिलमध्ये प्रदर्शित होणार आहे. सलमानसोबतच्या ‘एक था टायगर’ सिक्वलचा मुहूर्त देखील पुढील वर्षी असल्यामुळे सध्या कॅटरिनाकेडे भरपूर मोकळा वेळ असल्याचे दिसते.
कतरिनाने आपल्या मोकळ्या वेळेत भास्कर वृत्तसमुहाला दिलेल्या मुलाखतीमध्ये टिव्ही माध्यमांची स्तुती करताना दिसली. टिव्ही हे माध्यम पूर्वीसारखे छोटे राहिले नसून अधिक व्यापक बनले असल्याचे तिने यावेळी म्हटले.तसेच आपल्याला नृत्याची आवड असल्याचे सांगत तिने यावेळी टिव्हीरील नृत्याच्या कार्यक्रमाची ऑफर मिळाली तर आनंदाने स्वीकारेन असे देखील सांगितले. नृत्य कार्यक्रमामध्ये काम करण्यास उत्सुक असल्याचे सांगताना कतरिनाने नृत्य दिग्ददर्शक फराह खानच्या शिकवणीच्या आठवणींना देखील उजाळा दिला. नृत्य करत असताना माझ्या दंडामध्ये म्हणावा तसा ‘प्लोट नसल्याचे त्यांनी मला दाखवून दिले. त्यांच्या सल्ल्यानंतर मी नृत्यासाठी अधिक मेहनत घेतली. त्यामुळे मला नृत्यामध्ये अधिक रुची निर्माण झाल्याचे कतरिना यावेळी म्हणाली.
कतरिना कैफ आपल्या प्रत्येक भूमिकेबद्दल चोखंदळ असते. तिने आपल्या ‘बार बार देखो’ या चित्रपटामध्ये काही सीनमध्ये ती बिकनीमध्ये दिसली होती. बिकनीसाठी तिचे वजन जास्त असल्यामुळे ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी तिने सात किलो वजन कमी केले. मात्र तिच्या चाहत्यांनी हा चित्रपट एकवेळाही बघितला नाही नसावा अशीच परिस्थिती दिसली. कतरिना आणि सिद्धार्थची ‘सिझलिंग केमिस्ट्री’ असणारा ‘बार बार देखो’ या चित्रपट चाहत्यांच्या मनात घर करण्यात सपशेल अपयशी ठरला होता.