अभिनेता रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यंदाच्या वर्षी ‘जग्गा जासूस’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ‘जग्गा जासूस’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अनेकदा बदलण्यात आली असून सरतेशेवटी ७ एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. रणबीर आणि कतरिनाच्या नात्यात आलेल्या दुराव्यानंतर या चित्रपटाच्या वाटेत बऱ्याच अडचणी आल्या होत्या. बहुधा चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्येही काही अडचणी येत असल्याचे वृत्त पिंकव्हिलाने प्रसिद्ध केले आहे.
रणबीर आणि कतरिनाच्या ब्रेकअपला आता बरेच दिवस उलटले असूनही त्यांच्या नात्यामध्ये कोणत्याही प्रकारचा सकारात्मक बदल झाला नसल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळेच कतरिनाने रणबीरसोबत आगामी ‘जग्गा जासूस’ या चित्रपटाचे प्रमोशन करण्यास नकार दिल्याचे वृत्त एका दैनिकाने प्रसिद्ध केले आहे. इथे लक्ष वेधण्याची बाब अशी की, कतरिनासोबत चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी रणबीरने कोणतीही हरकत दर्शविली नाहिये. पण, कतरिनाच्या या नकारामुळे तिला अजूनही झाल्या गोष्टींचा विसर पडला नसल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आता येत्या काळात ‘जग्गा जासूस’च्या प्रमोशनसाठी कॅट कशा प्रकारे सहभागी होणार याकडेच अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे.
या चित्रपटाच्या निमित्ताने कतरिना कैफसुद्धा बऱ्याच काळानंतर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. त्यातही रणबीर आणि तिची ऑनस्क्रिन केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण आहे. ‘जग्गा जासूस’च्या ट्रेलरमधील कतरिनाच्या लूकवरही अनेकांच्या नजरा खिळल्या असतील यात शंकाच नाही. ट्रेलरमधील काही दृश्ये पाहता रणबीर आणि अनुरागच्या ‘बर्फी’ या चित्रपटाची आठवण आल्यावाचून राहणार नाही. ‘जग्गा जासूस’ चित्रपट कौटुंबिक मनोरंजनासाठी परिपूर्ण असा असल्याचे म्हटले जातेय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘जग्गा जासूस’च्या आयुष्यातील काही मजेशीर क्षण आणि थरार चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पाहावयास मिळणार आहे.
अनुराग बासू सोबत रणबीरचा हा दुसरा चित्रपट आहे. यापूर्वी त्याने अनुरागच्या ‘बर्फी’ या चित्रपटामध्ये काम केले होते. ‘जग्गा जासूस’ नंतर अभिनेता रणबीर कपूर आणि अनुराग बासू प्रसिद्ध गायक किशोर कुमार यांच्या जीवनावर बनणाऱ्या एका चित्रपटासाठीदेखील एकत्र काम करणार आहेत.