बॉलिवूडची हॉट अभिनेत्री कतरिना कैफने काहीच दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर दमदार पदार्पण केले होते. सोशल मीडियावर तिचा वाढता वावर हा तिच्या चाहत्यांना नक्कीच सुखावणारा आहे. ती दिवसातून एखादा फोटो तरी इन्स्टावर टाकतेच. फोटो शेअर करून प्रसिद्धी झोतात कसं राहायचं हे गणित कतरिनाला चांगलंच उमजलं आहे असं म्हणायला हरकत नाही.

नुकताच कतरिनाने तिचा लहानपणीचा फोटो इन्स्टावर शेअर केला. या फोटोला कॅप्शन देताना ती म्हणाली की, ‘आत्ताच मला हा फोटो मिळाला. १२ वर्षांची असतानाही मी चांगल्या पोझ देत होती.’ कतरिनाच्या या फोटोमध्ये तिच्या चेहऱ्यावरचे कोवळेपण दिसते. कतरिनाने २६ एप्रिलला तिचे इन्स्टाग्राम अकाऊंट सुरू केले होते आणी २७ एप्रिलला तिने पहिला फोटो टाकला होता. याआधी तिने २५ एप्रिलला तिच्या फेसबुकवरून एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये तिने हातात २७ एप्रिल लिहिलेला कागद धरला होता. तिच्या या फोटो मागची कल्पना तिच्या चाहत्यांना २७ एप्रिलला तिचा पहिला इन्स्टा फोटो पाहून कळाली.

कतरिना नेहमीच सोशल मीडियापासून चार हात लांबच राहिली आहे. तिने गेल्यावर्षी आपल्या वाढदिवसाला फेसबुक अकाऊंट सुरू केले होते. आता इन्स्टाग्रामवरही ती आपले नवनवीन फोटो टाकून तिच्या चाहत्यांना खूश करत आहे. कतरिना इन्स्टाग्रावर येताच बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी वेगवेगळ्या पद्धतीने तिचे स्वागत केले. यात सलमान खानपासून शाहरुख खानपर्यंत साऱ्यांचाच समावेश होता. आलियाने कतरिनाच्या इन्स्टाग्राम फोटोला रिपोस्ट करत म्हटले की, शेवटी आम्ही तिला इन्स्टावर घेऊनच आलो.