बरेच चित्रपट किंवा टेलिव्हिजन शो हे त्यांच्या अनोख्या शैलीमुळे चर्चेत असतात. असाच एक कार्यक्रम म्हणजे ‘कौन बनेगा करोडपती’. बऱ्याच वर्षांपासून या कार्यक्रमाने सर्वसामान्य व्यक्तींना करोडपती होण्याची संधी दिली. काही दिवसापूर्वीच या शोच्या १० व्या पर्वाला सुरुवात झाली आहे. दरवेळी प्रमाणे या नव्या पर्वाच्या सूत्रसंचालनाची धुरादेखील अमिताभ बच्चन यांनी स्वीकारली आहे. विशेष म्हणजे या शोदरम्यान बिग बी यांनी एका व्यक्तीला सलाम केल्याचं दिसून आलं आहे.

अमिताभ बच्चन यांनी अनोख्या सूत्रसंचालनाच्या पद्धतीमुळे अनेकांची मन जिंकून घेतली आहे. त्यामुळे अनेक जण केवळ केबीसीच्या हॉट सीटवर बसण्यासाठी या शोमध्ये भाग घेत असतात. केबीसीच्या १० व्या पर्वाला ३ सप्टेंबरपासून सुरु झाली आहे.  केबीसीच्या नव्या भागामध्ये एक महिला स्पर्धक सहभागी होणार असून या दिवसाचं चित्रीकरण पूर्ण झालं आहे. या चित्रीकरणावेळी या स्पर्धकाने तिच्या वडीलांच्या जीवनातील संघर्ष बिग बींना सांगितला. हा संघर्ष ऐकून बिग बींनी महिला स्पर्धकाच्या वडीलांना सेल्युट केलं आहे.

‘तुम्ही केलेल्या कष्टांचं आज मुलीने चीज करुन दाखवलं आहे. खरतंर हे देशासाठी खूप मोठं उदाहरण आहे. मुलींना शिकविण्याविषयी तुमचे जे विचार आहेत ते देशातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजेत. विचार आणि इच्छाशक्ती प्रबळ असली की सारं काही होतं. तुमच्या या जिद्दीला आणि विचारांना माझा सलाम आहे’, असं अमिताभ म्हणाले.

दरम्यान, ‘एका पुरुषाच्या शिक्षणामुळे समाजातील एक व्यक्ती शिक्षित होते. मात्र जर एक महिला शिकली तर संपूर्ण कुटुंब शिकतं’, असं महात्मा गांधी म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याला खरं करणारी गोष्ट माझ्या नव्या स्पर्धकाची आहे, अशी ओळख बिग बी यांनी या शोमधील तिसऱ्या महिला स्पर्धकाची करुन दिली. या शोमध्ये सहभागी झालेली महिला एक शिक्षिका असून तिला शिकविण्यासाठी वडीलांनी हातगाडी चालविण्याचा निर्णय घेतला. इतकंच नाही तर त्यांच्या याच कष्टामुळे आज ही महिला पीएचडीदेखील करत आहे. हा भाग बुधवारी (५ सप्टेंबर) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.