नीलेश अडसूळ

सध्या सर्वच माध्यमांवर ‘खारी आणि बिस्कीट’ या निरागस बहीण-भावांनी रसिकांना भुरळ घातली आहे. त्यातही आपल्या इवल्याशा अंध बहिणीला सावरणारा तो छोटासा भाऊ  पाहून अनेकजण गहिवरले आहेत. ट्रेलरमध्ये दाखवण्यात आल्याप्रमाणे, अंध बहिणीच्या स्वप्नात रंग भरणारा, तिचे डोळे होऊ न वावरणारा भाऊ, बाहुलीसम भासणारी खारी आणि या दोघांमधील गोड नाते पाहण्यासाठी प्रेक्षक आतुरले आहेत. अर्थात ही चर्चा आहे १ नोव्हेंबरला प्रदर्शित होणाऱ्या संजय जाधव दिग्दर्शित ‘खारी-बिस्कीट’ या चित्रपटाची.

अवघ्या सहा वर्षांची खारी आणि नऊ  वर्षांच्या बिस्कीटला घेऊ न संजय जाधव यांनी हा चित्रपट साकारला आहे. प्रस्थापित कलाकारांना घेऊ नही काम करताना अनेक अडचणी येतात, इथे तर अगदी कोवळ्या वयातील मुलांकडून अभिनय करून घेणे आणि मनासारखा आशय मिळवणे तसे कठीणच होते. असे असतानाही या चित्रपटात मात्र अभिनय आणि आशय यांचे उत्तम समीकरण साधल्याचे ट्रेलरवरून लक्षात येते. या चित्रपटातील मुख्य कलाकार म्हणजेच खारीचे पात्र साकारणारी वेदश्री खाडिलकर अवघ्या सहा वर्षांची आहे तर बिस्कीटचे पात्र साकारणारा आदर्श कदम नऊ  वर्षांचा आहे. ‘खारी-बिस्कीट’च्या निमित्ताने दोन्ही बालकलाकारांनी चित्रपटातील काही गमतीजमती सांगितल्या आहेत. याविषयी खारी सांगते, वयाने लहान असल्यामुळे चित्रीकारणादरम्यान सगळ्यांकडून तिचे लाड पुरवले गेले. माझ्याच वयाची अनेक लहान मुले चित्रपटात असल्याने फावल्या वेळी आम्ही क्रिकेट खेळत होतो. बऱ्याचदा आमच्या या मस्तीमध्ये आमचे दिग्दर्शक आणि त्यांचे सहकारीही सहभागी व्हायचे. यावर बिस्कीट सांगतो, अनेकदा रात्रीचे चित्रीकरण असायचे अशा वेळी झोप आवरणे खूप कठीण होते. त्या वेळी असे विविध खेळ खेळून झोप घालवली जायची. पण चित्रपटात काम करण्याचा अनुभव आम्हाला खूप काही शिकवून गेला. काही प्रसंगांचे अर्थही आम्हाला कळत नव्हते. त्या वेळी त्यामागची पाश्र्वभूमी, अभिनय कसा हवा, दिग्दर्शकाला नेमके काय म्हणायचे आहे हे सगळे सोप्या भाषेत समजावले जायचे. हळूहळू सगळ्यांचेच एकमेकांशी नाते तयार झाले होते त्यामुळे आम्हालाही फार तणाव जाणवला नाही.

या चित्रपटात अभिनेत्री नंदिता पाटकर हिनेही माईची भूमिका साकारली आहे, तिच्यामध्ये आणि बिस्कीटमध्ये काही नाते नसतानाही एक अनामिक बंध तयार झाला आहे. त्या अनुभवाविषयी  बिस्कीट सांगतो, नंदिताताईला अनेक चित्रपटांमध्ये पाहिले होते, तिच्या कामाविषयी खूप ऐकले होते. त्यामुळे एवढय़ा मोठय़ा अभिनेत्रीसोबत आपण काम करणार याचे खूप दडपण आले होते. पण ताईला भेटल्यानंतर सगळी भीती पळून गेली. आम्हाला भेटायला येताना ती खाऊ  घेऊ न यायची आणि बोलता बोलता या प्रसंगात आपल्याला काय करायचे आहे, कसे करायचे आहे सगळे समजावून संगायची. पुढे पुढे ताईसोबत छान गट्टी जमली, असे बिस्कीट सांगतो.

या चित्रपटात वेदश्रीने या अंध मुलीची भूमिका साकारली आहे. त्याविषयी खारी सांगते, या भूमिकेसाठी माझ्यासाठी खास लेन्सेस बनवल्या गेल्या होत्या. मी घाबरू नये म्हणून आधी डॉक्टरांनी स्वत: लेन्स लावल्या आणि मला पटवून दिले की याने काही होत नाही. पण लेन्समधून काहीच दिसायचे नाही. त्यामुळे तीन महिने या लेन्स घालून तालीम करावी लागली. या तीन महिन्यांमध्ये ‘दादा’ने म्हणजेच बिस्कीटने माझी खूप साथ दिली. माझे कान माझे डोळे झाले तर दादा स्वत: माझे डोळे होऊ न माझ्या सोबत होता. त्यामुळे आम्हाला चित्रीकरणातपण अडचण आली नाही. या चित्रपटासाठी दोन्ही बालकलाकारांची तीन महिने कार्यशाळा घेण्यात आली होती. या कार्यशाळेत खारीला लेन्सेस लावून काम करावे लागत होते, तर बिस्कीटवर तिची जबाबदारी टाकली होती. याविषयी बिस्कीट सांगतो, मला सख्खी बहीण नाही, पण या तीन महिन्यांच्या काळात आम्ही इतके जवळ आलो आहोत की आता तीच माझी बहीण झाली आहे.

चित्रपटातील आवडलेल्या प्रसंगाविषयी खारी सांगते, ‘मे महिन्याच्या उन्हात चित्रीकरण सुरू होते. त्यात एका प्रसंगात मी टाकीवर बसलेले असते आणि बिस्कीट दादा पाइप फोडून माझ्या अंगावर पाणी उडवतो. त्या प्रसंगात मी आनंदी होऊ न चालू लागते,’ हा प्रसंग आपल्याला खूप आवडला,  अशी आठवण खारी सांगते. तर ‘मी थोडा मस्तीखोर असल्याने या चित्रपटातील सगळ्याच प्रसंगांत मी धमाल केली आहे, पण पत्र्यांवर धावून पतंग पकडण्याचा प्रसंग माझ्या खूप जवळचा आहे,’ असं बिस्कीट सांगतो.

चित्रपटाचा ट्रेलर आल्यापासून मात्र ‘वेदश्री’ आणि ‘आदर्श’ या दोघांनाही लोक खारी आणि बिस्कीट या नावाने ओळखू लागल्याचेही दोघांनी सांगतिले. विशेष म्हणजे दोघांच्याही शाळेत ‘खारी-बिस्कीट’ हा आनंदाचा आणि कौतुकाचा विषय झाला आहे. त्यामुळे दोघांसाठीही हा चित्रपट म्हणजे पर्वणी आणि अनुभवांची शिदोरी ठरणार आहे.