जगात आपण अनेक नातीगोती पाहतो. मात्र या साऱ्यामध्ये बहीण-भावाचं नातं अत्यंत निराळं आणि तितकंच खास असतं. त्यातच जर भाऊ मोठा असेल तर विचारायलाच नको. आपल्या बहीणीची लहानशी इच्छादेखील पूर्ण करण्यासाठी तो प्रयत्नशील असतो. असंच गोड बहीण-भावाचं नातं ‘खारी बिस्कीट’ या चित्रपटातून उलगडण्यात येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
‘खारी बिस्कीट’ या चित्रपटाची कथा खारी आणि बिस्कीट बहीण-भावाच्या जोडीभोवती फिरताना दिसत आहे. खारी पाच वर्षांची असून ती अंध आहे. त्यामुळेच आपल्या बहिणीला कधीही अंधत्वाची जाणीव होऊ नये यासाठी बिस्कीट कायम प्रयत्नशील असतो. हे जग डोळ्यांनी पाहता येत नसलं तरी ती कल्पनेच्या जोरावर बेमालूमपणे स्वप्न पाहत असते. विशेष म्हणजे तिचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बिस्कीट कायम प्रयत्न करत असतो. त्यातच आता खारीने वर्ल्डकप पाहण्याचं स्वप्न पाहिलं आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो. इतकंच नाही तर त्यासाठी तो जीवाचं रान करतो. खारीच्या स्वप्नासाठी त्याला काय काय करावं लागतं हे प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये दिसणार आहे.
वर्ल्ड कप पाहायला जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैशांची गरज असते. मात्र आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे इतके पैसे गोळा करणं त्याला शक्य नसतं. मात्र केवळ खारीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो शक्य ती काम करतो. यात अगदी चोरी करण्यापासून ते रस्त्यावर विविध सोंग साकारुन लोकांचं मनोरंजन करण्यापर्यंत सारं काही बिस्कीट करतो.
दरम्यान, या चित्रपटामध्ये बिस्कीटची भूमिका आदर्श कदमने केली आहे तर खारी वेदश्री खाडिलकर हिने साकारली आहे. याशिवाय सोहम जाधव, स्वानंद शेळके, शर्व दाते या बच्चेकंपनी सोबत नंदिता पाटकर, सुयश झुंझुरके आणि संजय नार्वेकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या १ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.