अभिनेत्री कियारा अडवाणी म्हटल्यावर अनेकांना ‘एम.एस.धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ हा तिचा पहिला चित्रपट म्हणून आठवतो. पण त्याच्या दोन वर्षांपूर्वीच कियाराने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. ‘फगली’ हा तिचा पदार्पणाचा चित्रपट होता. पण या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नाही. त्यामुळे यानंतर दुसरी संधी तरी मिळेल का असा प्रश्न कियाराला पडला होता. सध्या यशाची चव चाखणाऱ्या कियाराने ‘पिंकविला’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत तिच्या स्ट्रगलिंगच्या काळाविषयी सांगितलं.

“फगलीनंतर मला दुसरा चित्रपट मिळेल की नाही हीच शंका होती. मी काही रातोरात सेलिब्रिटी झाले नाही. पहिला चित्रपट प्रदर्शित होऊनही मला लोक ओळखत नव्हते. बऱ्याच ठिकाणी मी ऑडिशन द्यायला गेले. माझ्या आयुष्यातला तो पडता काळ होता. माझं करिअप संपुष्टात आलं की काय असं वाटत होतं. लोकांना असं वाटतं की मी सलमानला ओळखते म्हणजे मला लगेच ऑफर्स मिळतील. पण असं काही नसतं. इंडस्ट्रीत ओळखीचा म्हणावा तितका फायदा होत नाही. पण मी स्वत:वरचा विश्वास गमावला नव्हता. स्वत:च्या अभिनयावर आणखी लक्ष देत होती, मेहनत घेत होती. बरेच ऑडिशन्स दिले. अनेकांनी नकार दिला. अखेर मला ‘एम.एस. धोनी’च्या चित्रपटाची ऑफर मिळाली. या चित्रपटाने मला प्रेक्षकांशी जोडलं. त्यानंतर ‘लस्ट स्टोरीज’ या चित्रपटामुळे माझ्या करिअरला मोठं वळण मिळालं. माझ्यातील अभिनयकौशल्याची चुणूक अनेकांना दिसली. आता कुठे मला बरेच ऑफर्स स्वत:हून येऊ लागले आहेत”, असं ती म्हणाली.

आणखी वाचा : ‘काहे दिया परदेस’ फेम अभिनेत्री झळकणार या चित्रपटात

कियाराच्या ‘कबीर सिंग’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिस गाजवला. शाहिद कपूरच्या तुलनेत कियाराची दुय्यम भूमिका होती. तरीसुद्धा त्यात ती भाव खावून जाते. आता कियाराकडे चित्रपटांची रांगच लागली आहे. ‘गुड न्यूज’, ‘लक्ष्मी बाँब’, ‘इंदू की जवानी’ आणि ‘भुलभुलैय्या २’ या चित्रपटांमध्ये कियारा आगामी काळात झळकणार आहे.