अभिनेता शाहरुख खान पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. बॉलिवूड कलाकार आणि त्यांच्या चाहत्यांमधील नातं नेहमीच खास असतं. त्यातही काही कलाकारांचा चाहता वर्ग सातासमुद्रापलीकडेही आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने बी टाऊनच्या कलाकारांच्या परदेशवाऱ्या सतत सुरुच असतात. किंग खानही सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी देशाबाहेर आहे. अभिनेता शाहरुख खान आणि त्याच्याभोवती असणारं चाहत्यांचं वलय ही काही नवीन बाब नाही. पण एका चाहत्याला शाहरुखने दिलेली वागणूक पाहून सध्या अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सोशल मीडियावर एका संकेतस्थळाद्वारे सध्या व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये किंग खानचा राग पाहायला मिळत आहे.
टर्की येथे अंगरक्षक आणि चाहत्यांच्या गराड्यातून जात असताना किंग खान एका चाहत्याला दूर ढकलताना आहे. पण असे असले तरीही पुढे जाऊन किंग खान चाहत्यांसमवेत सेल्फीही काढताना दिसतो. त्यामुळे चाहत्यावर रागावलेला शाहरुखचा हा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. किंग खान त्याच्या रागामुळे चर्चेत येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. काही वर्षांपूर्वी ‘आयपीएल’ क्रिकेट सामन्यांदरम्यान सुरक्षा रक्षकासोबत झालेल्या वादामुळे शाहरुखच्या नावे तक्रार नोंदवण्यात आली होती. फक्त शाहरुखच नाही तर चित्रपटसृष्टीतील इतर कलाकारही बऱ्याचदा सार्वजनिक ठिकाणांवर किंवा कार्यक्रमांदरम्यान त्यांच्या गैरवर्तणुकीमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.
वाचा: शाहरुख बरोबर सिनेमा नाही तर या गोष्टी करण्यात अनुष्का झालीय व्यस्त
दरम्यान सध्या शाहरुख त्याच्या ‘द रिंग’ या चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त आहे. अॅम्सटरडॅममध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु असून इम्तियाज अली या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे.