गेल्या काही वर्षांमध्ये अनेक तरुण मराठी कलाकारांनी हॉलीवूडपटांपर्यंत झेप घेतली आहे. अभिनेत्री क्रांती रेडकर, स्मिता तांबे, उषा जाधव, राधिका आपटे, राजेश शृंगारपुरे या मराठमोळ्या कलाकारांनी हिंदीबरोबरच हॉलीवूडपटांमध्येही काम के ले आहे. या मराठमोळ्या मांदियाळीत आता अभिनेत्री किशोरी शहाणे-विज यांचेही नाव सामील झाले आहे. ‘स्टेप अप’ या नृत्यावर आधारित चित्रपटांचा लेखक आणि ‘मेक युवर मूव्ह’चा दिग्दर्शक डय़ुएन अॅडलेरच्या आगामी चित्रपटात किशोरी शहाणे यांनी काम केले असून २०१७ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
‘स्टेप अप’ ही नृत्यावर आधारित गाजलेली हॉलीवूड चित्रपट मालिका आहे. नृत्यदिग्दर्शन आणि नृत्याचे वेगवेगळे फॉम्र्स यांना कथेतून हाताळणाऱ्या ‘स्टेप अप’ चित्रपटाच्या माध्यमातून एक वेगळा जॉनर दिग्दर्शक म्हणून डय़ुएन अॅडलेर यांनी यशस्वी केला. त्यांचा आगामी ‘हार्टबीट्स’ हा चित्रपटही नृत्यावर आधारित असून या इंडो-अमेरिकन चित्रपटासाठी त्यांनी अभिनेत्री किशोरी शहाणे यांची निवड केली. डय़ुएनच्या या चित्रपटात मूळची भारतीय पण अमेरिकेत स्थायिक असलेली मध्यवर्ती व्यक्तिरेखा होती. त्याने माझी छायाचित्रे पाहिली आणि त्याला या व्यक्तिरेखेसाठी माझा चेहरा योग्य वाटला. शिवाय, त्याला अपेक्षित इंग्रजी उच्चार माझ्याकडून आल्याने त्याने माझी या भूमिकेसाठी निवड केली, अशी माहिती किशोरी शहाणे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. ‘हार्टबीट्स’ची कथाही डय़ुएनने लिहिली असून हा चित्रपट भारतीय नृत्यावर आधारित आहे.
हॉलीवूड दिग्दर्शकाबरोबर काम करण्याची ही पहिलीच वेळ होती. पण डय़ुएन आणि त्याची टीम इतकी छान आणि मोकळेपणाने वागते की पहिल्याच भेटीत त्याने आपले मन जिंकून घेतले, असे किशोरी शहाणे यांनी सांगितले. या चित्रपटात अमेरिकेत स्थायिक असलेल्या भारतीय स्त्रीची भूमिका किशोरी शहाणे यांनी केली असून मुलाच्या निमित्ताने ती भारतात येते आणि तिथून पुढे कथा आकार घेते, असे त्यांनी सांगितले. तुमची भूमिका, पटकथा, संवाद सगळे तुमच्या हातात असते. एखादी गोष्ट तुम्हाला पूर्ण लक्षात येईपर्यंत ती समजावली जाते आणि अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने या टीमचे काम सुरू असल्याने एक वेगळे समाधान मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले. हा चित्रपट पन्नास टक्के भारतात आणि अमेरिके त असा चित्रित करण्यात येणार आहे. नुकतेच अंबरनाथमध्ये चित्रीकरण करण्यात आले. आता पवईत चित्रीकरण होणार असून २०१७ मध्ये हा चित्रपट प्रेक्षक भेटीला येणार असल्याचे किशोरी शहाणे यांनी सांगितले. हॉलीवूडपटाबरोबरच आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘मोहेंजोदडो’ या चित्रपटातही किशोरी शहाणे अभिनेता हृतिक रोशनबरोबर दिसणार आहेत.