करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. करोनाचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा लॉकडाउनचा कालावधी ३ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. अशा कठिण काळात प्रेक्षकांचे मनोरंजन व्हावे म्हणून दूरदर्शन वाहिनीवरील ८० ते ९० च्या काळातील गाजलेल्या मालिका पुन्हा दाखवण्यास सुरुवात केली. यातील प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणारी मालिका म्हणजे ‘श्रीमान श्रीमती.’ मालिका पुन्हा दाखवण्यास सुरुवात केल्यानंतर चिंटू हा बालकलाकार आता कसा दिसत असेल असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
‘श्रीमान श्रीमती’ या मालिकेत अजय नागरथने जतिन कानकिया आणि रीमा लागू यांचा मुलगा चिंटूची भूमिका साकारली होती. मालिकेत चिंटू हा अतिशय मस्तीखोर मुलगा दाखवला होता. तो शेजाऱ्यांशी होणाऱ्या भांडणाचा आनंद घेत असे. प्रेक्षकांना मालिकेतील चिंटू हे पात्र प्रचंड आवडले होते. त्यावेळी चिंटू केवळ आठ वर्षांचा होता. पण आता हा चिंटू कसा दिसत असेल असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
अजयने छोट्या पडद्यावर काम करत अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर त्याने १९९७ शाहरुख खानच्या परदेस चित्रपटात काम केले. तसेच त्याने सलमानच्या जलवा, एक और एक ग्यारह आणि मिलेंगे मिलेंग या चित्रपटात काम केले. अजयने शाहरुख आणि अनुष्कासोबत ‘जब हॅरी मेट सेजल’ या चित्रपटात देखील काम केले आहे. त्याने छोड्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका CID मध्ये इन्स्पेक्टर पंकज ही भूमिका साकारली होती.
९०च्या दशकात ‘श्रीमान श्रीमती’ या मालिकेने आपला वेगळाच प्रेक्षक वर्ग निर्माण केला होता. या मालिकेतील केशव कुलकर्णी, कोकिला कुलकर्णी, चिंटू दिलरुबा, फिल्मस्टार प्रेमा शालिनी, गोखले, शर्माजी ही पात्र आजही लोकांच्या चांगलीच लक्षात आहेत. त्यामुळे ‘रामायण’, ‘महाभारता’नंतर ही मालिका पुन्हा दाखवण्यात यावी अशी मागणी सोशल मीडियावर होऊ लागली होती. प्रेक्षकांच्या या मागणीनंतर मकरंद अधिकारी यांची ‘श्रीमान श्रीमती’ ही मालिका दूरदर्शन वाहिनीवर दुपारी २ वाजता प्रदर्शित होऊ लागली. या मालिकेत जतीन कनकिया, रीमा लागू, राकेश बेदी, अर्चना पूरण सिंह हे प्रमुख भूमिकेत होते. आता हे कलाकार पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.