‘बाहुबली’तील देवसेना असे म्हटले की आपसुकच अभिनेत्री अनुष्का शेट्टीचे नाव डोळ्यांसमोर येते. उद्या अनुष्काचा ३६ वा वाढदिवस. या हरहुन्नरी अभिनेत्रीच्या आजपर्यंतच्या कारकिर्दीवर नजर टाकुयात. आम्ही तुमच्यासाठी खास घेऊन आलोय अनुष्का शेट्टीशी निगडीत काही खास गोष्टी…
अनुष्का शेट्टीची एक झलक पाहण्यासाठी तिचे चाहते वाट्टेल ते करण्यास तयार असतात. ती स्वतःला फिट कसे ठेवते, हे जाणून घेण्यासाठी तिचे जगभरातील चाहते उत्सुक असतात. पण तुम्हाला माहिती आहे का, २००५ मध्ये तेलगू सिनेमांमधून सिनेसृष्टीत प्रवेश करणारी अनुष्का योग प्रशिक्षक होती. तिने भारत ठाकूर यांच्याकडून योगचे प्रशिक्षण घेतले आहे. भारत ठाकूर हा अभिनेत्री भूमिका चावलाचा नवरा आहे.
अनुष्काच्या आहारात फळ आणि हिरव्या भाज्या यांचा भरपूर समावेश असतो. आपल्या फिटनेसबाबत ती नेहमीच जागरुक असते. एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत अनुष्काने सांगितले की, ती रात्री आठपूर्वी जेवते. रात्रीचे जेवण ते झोप यामध्ये किमान २ ते ३ तासांचे अंतर असणे आवश्यक असल्याचे ती म्हणते. संध्याकाळी ७.३० ते ८ च्या दरम्यान जेवण केल्यास ते पचायला पुरेसा वेळ मिळतो. यामुळे त्वचा टवटवीत राहते.
अनुष्का दररोज किमान दोन तास तरी व्यायाम करते. २०१५ मध्ये आलेल्या ‘साईज झीरो’ या सिनेमासाठी तिने जवळपास २० किलो वजन वाढवले होते. या सिनेमात तिने एका जाड्या मुलीची व्यक्तिरेखा वठवली होती. या सिनेमानंतर बाहुबली सिनेमासाठी अनुष्काने मेहनत घेत स्वतःला पुन्हा एकदा फिट केले. या सिनेमात तिने एका राजकुमारीची व्यक्तिरेखा साकारली होती.
अनुष्काने तिच्या १२ वर्षांच्या करिअरमध्ये ३० हून अधिक तामिळ आणि तेलगु सिनेमांमध्ये काम केलं आहे. तिच्या नावावर ‘बाहुबली’ आणि ‘रूद्रमादेवी’ सारख्या हिट सिनेमांची नोंद आहे.
अनुष्का शेट्टी ही नेहमीच तिच्या कथित प्रेमप्रकरणांमुळे चर्चेत राहते. पण तिने नेहमीच या गोष्टींना नाकारलं आहे. काही दिवसांपूर्वी तर अनुष्काने गुपचुप लग्न केल्याचीही अफवा आली होती. त्यानंतर तिचं नाव ‘बाहुबली’ फेम प्रभास याच्यासोबतही जोडलं गेलं होतं. दोघे लग्न करणार असेही बोलले जात होते. मात्र, याबद्दल दोघांनीही कधीही जाहीरपणे भाष्य केलं नाही.