प्रसिद्ध अभिनेता जॅकी श्रॉफचा मुलगा टायगर श्रॉफच्या बॉलिवूड पदार्पणानंतर आता त्याची मुलगी कृष्णा श्रॉफ बॉलिवूडमधील पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. टायगर बॉलिवूडमध्ये चांगली कामगिरी करत असून, ‘बागी’ आणि ‘हिरोपंती’ हे दोन हीट चित्रपट त्याने आत्तापर्यंत दिले आहेत. आता लवकरच कृष्णादेखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती बॉलिवूड चित्रपटांमधून अभिनय करणार असल्याचा तुमचा अंदाज असेल, तर तो चुकीचा आहे. कृष्णा दिग्दर्शनाच्या क्षेत्रात आपले नशीब आजमावणार आहे. कृष्णा तिचा भाऊ टायगरचा आगामी चित्रपट ‘मुन्ना मायकल’पासून बॉलिवूडमधील आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणार असल्याचे बॉलिवूड संकेतस्थळ स्पॉटबॉय डॉट कॉमने म्हटले आहे. ‘मुन्ना मायकल’ चित्रपटासाठी ती सहायक दिग्दर्शक म्हणून काम पाहणार असल्याचे या वृत्तात म्हटले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शब्बीर खान करणार असून, कृष्णा ‘मुन्ना मायकल’साठी सहायक दिग्दर्शकाचे काम करणार असल्याची पुष्टी खान यांनी टि्वटरच्या माध्यमातून केली आहे. आपले हॉट आणि ग्लॅमरस अवतारातील फोटो इंस्टाग्रामवर शेअर करण्यासाठी कृष्णा चर्चेत असते. तिने आपले टॉपलेस आणि बिकनीच्या अवतारातले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यानंतर हे फोटो चांगलेच व्हायरल झाले. कृष्णाच्या बॉलिवूडमधील पदार्पणाबाबत बॉलिवूडमध्ये बऱ्याच काळापासून चर्चा होती. ती टायगर श्रॉफच्या ‘हिरोपंती’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये प्रवेश करणार अशी पहिल्यांदा चर्चा होती. परंतु, तसे होऊ शकले नाही.
जॅकी श्रॉफची मुलगी कृष्णाचा बॉल्ड अवतार