रेश्मा राईकवार
सगळय़ा शस्त्रांत प्रभावी असलेलं अस्त्र म्हणजे ‘ब्रह्मास्त्र’. ते ज्याच्या हाती तो पृथ्वीचा विनाश घडवून आणू शकतो. सध्या बॉलीवूडची आर्थिक स्थिती पाहता त्याला तारण्यासाठी एका प्रभावी ‘ब्रह्मास्त्रा’चीच गरज होती. माव्र्हलपटांची सवय आणि ‘बाहुबली’सारखा उत्तम गोष्ट आणि व्हीएफएक्सची योग्य सांगड घातलेला यशस्वी चित्रपटही तीन वर्षांपूर्वीच पचवलेल्या प्रेक्षकांसाठी अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’ अगदीच प्रभावहीन ठरला नाही इतकंच काय ते..

गोष्ट की व्हीएफएक्स? हा गोंधळच असता कामा नये. गोष्ट रंगवण्यासाठी व्हीएफएक्स तंत्राचा वापर करावा लागतो, पण मुळात गोष्ट रंगवून सांगण्याचं तंत्रच तुमच्याकडे नसेल तर बाकी सगळ्या कुबडय़ा घेऊन काय उपयोग? नऊ वर्षांची मेहनत आणि ४०० कोटींच्या वर निर्मितीखर्च असलेल्या ‘ब्रह्मास्त्र’ची कथा खुद्द अयाननेच लिहिली आहे. चित्रपटाची संकल्पना चांगली नाही का? खूप चांगली आहे. ‘अस्त्रावर्स’ नामक काल्पनिक विश्व रचणाऱ्या अयानने यात ब्रह्मास्त्रची पहिली कथा रंगवली आहे. महासत्ता होऊ पाहणाऱ्या कोणालाही आकर्षित करेल, स्वत:कडे ठेवावंसं वाटेल असं ब्रह्मास्त्र. जे तुकडय़ांच्या रूपात विखुरलं गेलं आहे. त्याचं रक्षण गेली कित्येक वर्ष काही पिढय़ा करत आल्या आहेत. त्या प्रत्येकाकडे स्वत:चं म्हणून एक अस्त्र आहे. आणि तरीही ब्रह्मास्त्राभोवती असलेली रक्षकांची ही कडी सहज भेदून कोणीतरी दुष्ट शक्ती ते बळकावू पाहते आहे. विनाशाचं हे तांडव शिवानामक तरुणाला स्वप्नात दिसतं, त्याला काहीतरी वेगळं घडतं आहे हे जाणवत राहतं. मग ते शिवालाच का दिसतं? कोण आहे हा शिवा? त्याचा ब्रह्मास्त्र आणि त्याच्या रक्षकांशी काय संबंध याचं उत्तर देण्याचा प्रयत्न हा चित्रपट करतो. म्हणजे तशी सुरुवात तरी करतो..

शिवाची गोष्ट सुरू होते न होते, तोच त्याच्या आयुष्यात ईशा येते. आणि मग शिवा आणि ईशा (म्हणजे पार्वती असा उल्लेख जाणीवपूर्वक चित्रपटात आहे) यांची कथा सुरू होते. त्यांच्या प्रेमकथेला समांतर म्हणून ब्रह्मास्त्रची कथा उलगडत जाते. त्याचं कारण म्हणजे चित्रपटात एकच गोष्ट अधोरेखित झाली आहे, ‘प्रेमाची शक्ती अपरंपार’. इथे वाईट शक्तीला नियंत्रित करण्याची ताकद फक्त प्रेमात आहे. शिवाचं ईशावर असलेलं निस्सीम प्रेम हे त्याचं खरं शस्त्र आहे, असं काहीसं चित्रपट आपल्याला सांगतो. शिवाला त्याचं प्रेम मिळवायचं आहे की आणखी काही.. हा गोंधळ लेखक – दिग्दर्शक म्हणून अयानला निस्तरता आलेला नाही हेच खरं. ही अस्त्रांची कथा आहे, वाईटावर चांगल्याच्या विजयाची कथा आहे की अघोरी महत्त्वाकांक्षेमुळे जगाला विनाशाच्या दारात नेऊन ठेवणाऱ्या शक्तीची कथा आहे? एका गोष्टीवर केंद्रित होण्यापेक्षा सगळंच एकेक करत कथेचं कडबोळं झालं आहे. ज्या अस्त्रांचा यात उल्लेख होतो त्याबद्दल कोणतेही तपशील येत नाहीत. त्यातल्या त्यात मोजून दोन ते तीन अस्त्रांचं दर्शन होतं. पण या शक्ती त्यांच्याकडे उपजत आहेत, त्यांनी मिळवल्या आहेत, त्यांची ताकद नेमकी कशात आहे, कशाबद्दलच सविस्तर वर्णन यात येत नाही. अर्धा वेळ पाठलाग आणि अर्धा वेळ शिवा-ईशाच्या प्रेमात जातो. कोणतंही निश्चित कथानक नसणं, कथेसाठी वापरलेले संदर्भ उल्लेखापुरते वापरणं अशा कितीतरी गोष्टींमुळे या चित्रपटाची कथा पाहणाऱ्याची पूर्ण पकड घेत नाही.

चित्रपटात सगळा पैसा जणू व्हीएफएक्सवर ओतला आहे. त्यामुळे त्यातले व्हीएफएक्स चांगले आहेत यात शंका नाही. ती मेहनत पडद्यावर दिसते. आतापावेतो या चित्रपटात शाहरुख खानही आहे हे सर्वदूर झालं आहे. त्याची छोटेखानी भूमिकाही सुखावणारी आहे. व्हीएफएक्सचा भडिमार असलेला चित्रपट करण्याचा अनुभव शाहरुखपाशी आहे. तरी त्याला देण्यात आलेलं अस्त्र आणि त्याचं व्यक्तिमत्त्व याची तशी काही सांगड घातली जात नाही, पण शाहरुखने अभिनयाच्या जोरावर ती कसर भरून काढली आहे. शिवाय, यात तो वैज्ञानिक मोहन भार्गव (स्वदेसमधील त्याची व्यक्तिरेखा) आहे. तीच गोष्ट नागार्जुनची. नागार्जुन आणि शाहरुख यांच्या भूमिका अधिक विस्ताराने आल्या असत्या वा त्यांचा संदर्भ किमान पुढे जाता तरी चित्रपट अधिक चांगला होऊ शकला असता. प्रेमकथेपुरता विचार केला तर रणबीर कपूर आणि आलिया भट्ट ही जोडी योग्य ठरते. मात्र त्यांच्या वैवाहिक नात्यांच्या संदर्भामुळे असेल अनेकदा त्यांच्या पडद्यावरील नात्यापेक्षा पडद्यामागचे नाते जास्त आठवते. रणबीरने काही दृश्यांमध्ये शिवाचा सूर खूप चांगला पकडला आहे. पण सुपरहिरो म्हणून जी प्रतिमा ठसायला हवी तो प्रभाव रणबीरला साधता आलेला नाही. त्या तुलनेत सुपरहिरो नसूनही ‘बाहुबली’ चित्रपटात प्रभास आणि खलनायक म्हणून राणा डग्गुबाती हे दोघंही त्यांच्या व्यक्तिरेखांमधून प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी झाले होते. आलिया भट्ट कधी नव्हे ती या चित्रपटात एखाद्या नाजूक बाहुलीसारखी वाटत राहते. त्या तुलनेत देहबोलीसह अनेक गोष्टी मौनी रायने अचूक पकडल्या आहेत. अर्थात, ‘नागिन’मुळे तिचा अनुभव वाढला असावा. अमिताभ बच्चन नेहमीच्या सहजतेने गुरू म्हणून वावरले आहेत. शिवाचे पूर्वार्धातील मित्र, त्याच्याबरोबरची लहानगी मुलं उत्तरार्धात पूर्ण गायब झाली आहेत. तीच गोष्ट ईशा ही अमेरिकेत वाढलेली एक श्रीमंत मुलगी आणि एखाददोन प्रसंगांत दिसणारे तिचे आजोबा वगळता तिच्याविषयीही इतर माहिती देण्याचे कष्ट दिग्दर्शकाने घेतलेले नाहीत. संगीतकार म्हणून प्रीतमने तिन्ही श्रवणीय गाणी दिली आहेत.

ब्रह्मास्त्रसारख्या कथा प्रतिमेतून उत्कट करण्यासाठी त्याबद्दलचे संदर्भ काल्पनिक का होईना अधिक अभ्यासपूर्ण आणि टोकदार असायला हवे होते. चित्रपटात शिवाच्या सुरुवातीच्या प्रसंगातील अंधारातही आपल्या आयुष्यातील प्रकाश आपणच शोधायला हवा हा एकमेव विचार वगळता इतर कुठलेही संवाद लक्षात राहत नाहीत. कथेशी उत्सुकता जोडलेली रहावी यासाठी काही रंजकता असायला हवी होती. इथे फक्त ये देवा कौन है? म्हणजे तो कोण आहे यापेक्षा पुढच्या चित्रपटात तो साकारणारा नायक कोण असेल? एवढंच शोधण्यात प्रेक्षकांना रस आहे. नायक-नायिकेची नेहमीची प्रेमभरी नजरा-नजर, प्रेमासाठी त्याग वगैरे त्याच त्याच गोष्टीला अस्त्रांच्या गोष्टीचे तुकडे जोडत आणि व्हीएफएक्सची झळाळी देत उभ्या केलेल्या या ब्रह्मास्त्रचा प्रभाव फार मर्यादित आहे.

ब्रह्मास्त्र
दिग्दर्शक – अयान मुखर्जी
कलाकार – रणबीर कपूर, आलिया भट्ट, अमिताभ बच्चन, नागार्जुन, मौनी रॉय, शाहरुख खान.